विक्रोळीत सिलिंडर स्फोटात दहा जखमी

By Admin | Published: October 18, 2015 03:09 AM2015-10-18T03:09:26+5:302015-10-18T03:09:26+5:30

कुर्ल्यातील सिटी किनारा हॉटेलमध्ये सिलिंडरच्या गळतीमुळे लागलेल्या आगीच्या दुर्घटनेला २४ तास उलटण्यापूर्वीच विक्रोळी पार्क साईट येथे शनिवारी

WikiLeaks cylinder blast injures ten | विक्रोळीत सिलिंडर स्फोटात दहा जखमी

विक्रोळीत सिलिंडर स्फोटात दहा जखमी

googlenewsNext

मुंबई : कुर्ल्यातील सिटी किनारा हॉटेलमध्ये सिलिंडरच्या गळतीमुळे लागलेल्या आगीच्या दुर्घटनेला
२४ तास उलटण्यापूर्वीच विक्रोळी पार्क साईट येथे शनिवारी
सकाळी त्याची पुनरावृत्ती झाली. एका घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन दोन महिलांसह दहाजण
गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर राजावाडी आणि सायन, कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याचे रुग्णालयातील सूत्रांकडून सांगण्यात आले.
विक्रोळी पार्क साईट येथील आंबेडकर नगर सोसायटी येथे राहत असलेल्या चौहान कुटुंबीयांच्या एक मजली घरात ही घटना घडली.
गॅस शेगडीला नवीन सिलिंडर
बसवित असताना त्याची कॅप तुटून गॅस बाहेर पडला. हा गॅस त्या ठिकाणच्या देव्हाऱ्यातील पेटत्या दिव्याशी संपर्क झाल्याने ही दुर्घटना घडल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
विमला चौहान (५०) यांच्या घरातील गॅस संपल्याने त्यांनी शेजारी राहात असलेल्या रेखा शिंदे यांच्याकडून सिलिंडर घेतला. गॅस शेगडीला जोडण्यासाठी त्याची कॅप उघडताच त्यातून जोराचा आवाज झाल्याने त्या घाबरल्या. त्याबाबत शिंदे यांना सांगण्यासाठी त्या आल्या असता, त्यांनी तातडीने घराबाहेर पडण्यास सांगितले. घरी असलेल्या मुलांना बाहेर काढण्यासाठी त्या परत घरी गेल्या आणि त्याच वेळी खोलीभर गॅस पसरल्याने सिलिंडरचा स्फोट झाला. त्यामुळे लागलेल्या आगीत विमल चौहान यांच्यासह त्यांचा मुलगा अनिकेत, तसेच नातेवाईकाची मुले सौरभ व सपना अडकले. सपनाच्या आरडाओरड्यामुळे शेजारच्या संतोष शिंदेने तिकडे धाव घेतली. त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात तोही आगीत भाजला. स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की, या स्फोटामुळे घराच्या भितींतील विटा बाहेर फेकल्या गेल्या. पहिल्या मजल्यावरील भाडेकरु दानवले कुटुंबीयांनी घाबरून थेट खाली उड्या मारल्या. त्यामध्ये सुमन दानवले (४५) व त्यांचा २२ वर्षाचा मुलगा राहुल जखमी झाला. चौहान यांचे घर रस्त्याच्या कडेला असून ही घटना घडली तेव्हा घराजवळून जात असलेले विजय सावंत (४१), मिराबाई माने (६५), देवगन सिंह (४०) यांनाही आगीची झळ बसून ते जखमी झाले. जखमींपैकी सपना, विमल आणि देवगन यांची प्रकृती गंभीर असल्याचे रुग्णालयातील सूत्रांकडून सांगण्यात आले.

जखमींची नावे (कंसात वय व भाजल्याचे प्रमाण)
संतोष शिंदे- (३१, ६० टक्के), अनिकेत चौहान (१७, ३०टक्के), विमल चौहान (५०, ९० टक्के), सौरभ चव्हाण (१७, २०टक्के), त्याशिवाय राहुल दानवले (२२) , सुमन दानवले (४ ५) विजय विष्णू सावंत (४१), मिराबाई माने (६५) किरकोळ जखमी झाले असून, या सर्वांवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याशिवाय सपना चौहान (१३) व देवगन सिंह (४०) सुमारे ८० टक्के भाजले असून, त्यांच्यावर अनुक्रमे कस्तुरबा व सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. मात्र अरुंद रस्त्यामुळे अग्निशमन दलाची गाडी वर पोहोचण्यास मार्ग नव्हता, जवानांच्या अर्धा तासाच्या प्रयत्नानंतर परिस्थिती आटोक्यात आली.

Web Title: WikiLeaks cylinder blast injures ten

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.