वणव्यांमुळे जैवविधता संकटात; मानव निर्मित वणवे रोखण्याचे आव्हान
By निखिल म्हात्रे | Published: January 15, 2023 07:00 PM2023-01-15T19:00:23+5:302023-01-15T19:00:33+5:30
हौशे, नवशे, गवसे पर्यटक धूम्रपान केल्यावर विडी, सिगारेट बेजबाबदारपणे कुठेही फेकून देतात. रात्री शेकोटी पेटवून थोडा वेळ बसून शेकोटी न विझवता बेजबाबदारपणे तेथून निघून जातात.
अलिबाग - यावर्षीच्या पावसाने हिरवेगार दिसणारे डोंगर उन्हाळा वाढू लागल्यानंतर अचानक काळे दिसू लागले आहेत. उन्हाची तीव्रता वाढू लागल्यानंतर माळरानावर पसरलेले गवत सुकू लागले आहे. या सुकणार्या गवताना अचानक वणवे लागत असून, मानवनिर्मित या वणव्यांमुळे नैसईगिक सौदर्याने नटलेल्या डोंगरांचा रंग काळा दिसत आहे. एरवी हिरवेगार दिसणारे डोंगर उन्हाळा सुरू होताच वणव्यामुळे काळे दिसू लागल्याने डोंगरांची शोभा हरवत असल्याने जैवविविधता धोक्यात आली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून उन्हाची काहिली वाढत आहे. उन्हाची तीव्रता वाढत असतानाच डोंगरांना अचानक आग लागून वणवे लागण्याचे प्रमाण वाढले आहे. वृक्षांनी समृद्ध असलेल्या या डोंगररांगा वणव्यामुळे ओसाड, उजाड होत आहेत. या वणव्यात मोठ्या वृक्षांच्या बरोबरीने लहान रोपांचीही हानी होत आहे. आंबे, काजू यासारखी फळझाडे करपून जात आहे. यामुुळे फळपीक मोहोर होरपळून जात असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. वन्यप्राण्यांनाही या वणव्याच्या मोठ्या प्रमाणात झळा बसत असून, त्यांचे अधिवास नष्ट होत आहेत. वेळीच वणवे रोखले नाहीत तर असणारी जैवविविधता धोक्यात येत आहे.
शिकारीसाठी लावले जातात वणवे
आगींमुळे औषधी वनस्पती, कीटक, जिवाणू, सर्प, पक्षी, सरडे, पाली, ससे, हरणे, कोल्हे, लांडगे या सर्वांचे जीव धोक्यात येतात आणि त्यामुळे जंगलातील जीवन विस्कळीत होऊन हे वन्यजीव निराश्रीत होतात याची कल्पना सर्वसामान्यांना नसते. जिल्ह्यात काही ठिकाणी वन्यप्राण्यांची शिकार करण्यासाठीही मुद्धामहून वणवे लावले जातात
निष्काळजीपणामुळे वनसंपदा संकटात
हौशे, नवशे, गवसे पर्यटक धूम्रपान केल्यावर विडी, सिगारेट बेजबाबदारपणे कुठेही फेकून देतात. रात्री शेकोटी पेटवून थोडा वेळ बसून शेकोटी न विझवता बेजबाबदारपणे तेथून निघून जातात. अशाप्रकारच्या पर्यटकांच्या निष्काळजीपणा आणि बेदरकारीमुळे वनसंपदेचे नुकसान होत होत आहे.
वणव्यांमुळे निसर्ग सौंदर्य बिघडत आहे. पर्यावरणाची आतोनात हानी होत आहे. त्यामुळे जनजागृती करून वणवे लावण्याचे प्रमाण कमी केले पाहिजे. गेल्या काही दिवसांपासून वणवे लागत असल्याने आंबे, काजू पिकांचे नुकसान होत आहे. नुकताच मोहोर येऊ लागला आहे. हा मोहर करपून जाण्याची श्यक्यता आहे. वनसंपत्तीबरोबर पशुपक्ष्यांना या वणव्याचा त्रास होत आहे. वेळीच हे वणवे रोखले पाहिजे.
- डाॅ. सचिन पाटील, पर्यावरणप्रेमी, अभ्यासक.