मेट्रो कारशेडवरुन ठाकरे आक्रमक, उरलेली जागा बिल्डरच्या घशात घालणार का?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2023 08:01 PM2023-04-15T20:01:51+5:302023-04-15T20:02:55+5:30
मुंबई मेट्रो कारशेडवरुन शिवसेना ठाकरे गट आणि भाजप नेते किंवा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात मतभेद आहेत
मुंबई - शिवसेनेचे तरुण नेते आदित्य ठाकरे शिंदे-फडणवीस सरकारच्या कामाकाजावर सातत्याने बोट दाखवत आहेत. यापूर्वी, आदित्य यांनी मुंबई महापालिकेच्या कामकाजात मोठा भ्रष्टाचार होत असल्याची टीका करत प्रशासन व मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला होता. आता, पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंना लक्ष्य केलं आहे. मेट्रो लाईन ६ साठी उभारण्यात येत असलेल्या कारशेडच्या जागेवरुन आदित्य यांनी अनेक प्रश्न विचारले आहेत. तसेच, कांजुरमार्गमधील कारशेडसाठी १५ हेक्टर जागा देण्यात येणार आहे. मग, उरलेली जागा कोणाच्या घशात घालणार? असा सवाल आदित्य यांनी विचारला आहे.
मुंबई मेट्रो कारशेडवरुन शिवसेना ठाकरे गट आणि भाजप नेते किंवा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात मतभेद आहेत. आदित्य ठाकरे यांनी पर्यावरणमंत्री असताना आरे कारशेडला विरोध करत, आरेचं जंगलं वाचलं पाहिजे, अशी भूमिका घेतली होती. मात्र, राज्यात महाविकास आघाडीचं सरकार गेलं आणि शिंदे-फडणवीस सरकारने शपथ घेतली. त्यानंतर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरेतच कारशेड उभारण्यात येणार असल्याचं जाहीर केलं. तो वाद सुरु असतानाचा आता आदित्य यांनी मेट्रो लाईन ६ साठी कांजूरमार्ग येथील जागेवरुन प्रश्न उपस्थित केले आहेत.
— Shivsena UBT Communication (@ShivsenaUBTComm) April 15, 2023
''महसूल खात्याने सांगितलंय की, मेट्रो लाईन ६ साठी कांजूरमार्गच्या जागेतील १५ हेक्टर जागा एमएमआरडीएला हस्तांतरीत केली जावी. मला वाटतं, ही बातमी मुंबईच्या दृष्टीकोनातून फार मोठी आहे. आम्ही सातत्याने बोलत आहोत. लाईन ६ साठी कारशेड गरजेचं आहे. याबाबतचं टेंडर कारशेडविना २०१८ मध्ये काढण्यात आलं. नंतर कारशेड बनवणार कुठं? हा मोठा प्रश्न होता. २०२०-२१ च्या काळात तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण कारशेड कांजूरमार्गला हलवलं होतं. लाईन ६, ३, १५, ४ या चार लाईनचे डेपो एकाच ठिकाणी करणार होतो. जनतेचे पैसे वाचावे, वेळ वाचावे यासाठी प्रयत्न सुरु होते. त्यातून दहा ते साडे दहा कोटी रुपये आपण महाराष्ट्राचे वाचवले असते. याशिवाय वेळ वाचवला असता”, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, कांजूरमार्गच्या जागेतील १५ हेक्टर जागा मेट्रो ६ साठी देणार आहेत. मग उर्वरित जागा बिल्डरांच्या घशात घालायला ठेवलेली आहे का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला. तसेच मेट्रोची लाईन कल्याण डोंबिवलीपर्यंत जाणार आहे. त्यामुळे ठाण्यात दोन कारशेड बनवण्यात येणार आहेत. त्यावरुनही आदित्य ठाकरे यांनी टीका केली.