चंद्र आणि मंगळावरही सहल जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:07 AM2021-07-29T04:07:28+5:302021-07-29T04:07:28+5:30

मुंबई : नागरिकांना आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर १० दिवसांच्या सशुल्क सहलीसाठी पाठविण्याची योजना स्पेस एक्स ही कंपनी आखत आहे. तसेच ...

Will also visit the Moon and Mars | चंद्र आणि मंगळावरही सहल जाणार

चंद्र आणि मंगळावरही सहल जाणार

Next

मुंबई : नागरिकांना आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर १० दिवसांच्या सशुल्क सहलीसाठी पाठविण्याची योजना स्पेस एक्स ही कंपनी आखत आहे. तसेच ही कंपनी चंद्र आणि मंगळावर अवकाश सहलींचे आयोजन करण्याचा विचार करीत आहे, अशी माहिती मुंबईतील व्ही.एम. वैद्यकीय केंद्रातील अवकाशसंबंधी वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. पुनिता मसरानी यांनी दिली. टेसला मोटर्सच्या एलॉन मस्कने २००२ मध्ये स्पेस एक्स ही अमेरिकेतील अवकाशयान निर्मिती करणारी कंपनी स्थापन केली. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर जाण्यासाठी नासाच्या अंतराळवीरांनी जे ड्रॅगन अवकाशयान वापरले ते याच कंपनीने निर्माण केले होते, असेही त्यांनी सांगितले.

वरळी येथील नेहरू विज्ञान केंद्राकडून भारतीय वैमानिकी संस्थेच्या मुंबई शाखेच्या सहकार्याने ‘अवकाश पर्यटन : भविष्यातील झेप’ या विषयावर मंगळवारी आयोजित ऑनलाइन व्याख्यानात डॉ. पुनिता मसरानी बोलत होत्या. व्यावसायिक पातळीवरील अवकाश प्रवासाचे विविध पैलू डॉ. पुनिता मसरानी यांनी या व्याख्यानात स्पष्ट केले. त्या म्हणाल्या, नासा आणि रशियाच्या अवकाश संस्थेने पर्यटकांसाठी अवकाश प्रवासाची सुविधा सुरू केली होती. मात्र ती अतिशय खर्चीक असून सर्व प्रक्रिया कठोर होती. रशियाचे सोयुझ अवकाशयान दर सहा महिन्यांनी पर्यटकांना अवकाशात घेऊन जात असे.

स्पेस ॲडव्हेंचर्स ही अवकाश पर्यटन क्षेत्रातील पहिली संस्था होय. अमेरिकी अब्जाधीश रिचर्ड गॅरियॉट यांनी १९९८ मध्ये ही संस्था सुरू केली. या संस्थेद्वारे लोकांना शुल्क घेऊन रशियाच्या सोयुझ रॉकेटमधून सवारीची सुविधा मिळत असे. डेनिस टिटो हा पहिला व्यावसयिक अवकाशयान प्रवासी मानला जातो. त्याच्या आधी संशोधन कार्यासाठी फक्त अंतराळवीर अवकाशात गेले होते. टिटो एप्रिल २००१ मध्ये रशियाच्या सोयुझ टीएमए प्रक्षेपक वाहनातून अवकाशात गेला होता.

अवकाश पर्यटनाची संकल्पना

नासा आणि रशियाच्या अवकाश संस्थेने अवकाश पर्यटनाचा कार्यक्रम बंद केल्यानंतर उद्योजक आणि व्यावसायिकांना वाटले की ते अवकाश प्रवासाची सुविधा सुरू करू शकतात जेणेकरून अधिकाधिक लोकांना अवकाशात फिरून येता येईल आणि यातूनच अवकाश पर्यटनाच्या संकल्पनेने जन्म घेतला. नासाने नुकतीच खासगी पर्यटकांना आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर छोट्या भेटीवर नेण्यासाठी परवानगी दिली आहे. ‘ॲक्सिऑम स्पेस’सारख्या कंपन्या खासगी अंतराळवीरांना प्रशिक्षण देत आहेत. ही कंपनी खासगी अंतराळ स्थानकाच्या निर्मितीचेदेखील नियोजन करत आहे, असेही डॉ. पुनिता मसरानी म्हणाल्या.

Web Title: Will also visit the Moon and Mars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.