Join us

एटीकेटी आणि बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांसाठी योग्य वेळी योग्य निर्णय जाहीर करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2020 6:58 PM

संभ्रमावस्थेला , गैरसमजांना बळी न पडण्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

मुंबई : पदवी व पदव्युत्तरच्या अंतिम सत्राच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा राज्य सरकारकडून रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र ज्या अंतिम सत्राच्या विद्यार्थ्यांचे काही विषय राहिले आहेत किंवा ज्यांना एटीकेटी आहेत अद्याप त्यांच्याविषयी काहीच निर्णय जाहीर करण्यात न आल्याने हे विद्यार्थी संभ्रमात आहेत. या विद्यार्थ्यांबद्दल उच्च व तंत्र शिक्षण विभागाने स्पष्टता द्यावी अशी मागणी  विविध माध्यमांद्वारे ते आमदार आणि नेत्यांपर्यंत पोहचवीत आहेत. दरम्यान ज्याप्रमाणे अंतिम स्तरातील परीक्षांविषयी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने निर्णय घेतला आहे तसाच तो या विद्यार्थ्यांच्या बाबतीत ही लवकरच जाहीर करू असे आश्वासन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विद्यार्थ्यांना दिले आहे.राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता पदवी अंतिम वर्षे विद्यार्थ्यांच्या परिक्षा न घेता मागील शैक्षणिक वर्षातील पडलेल्या गुणांची सरासरी काढून पास केले जाणार आहे. ज्यांना कमी गुण पडले आहेत, असे वाटत असेल त्यांना नंतर परीक्षा देऊन गुण वाढविण्याच्या संधी दिली जाईल असा निर्णय स्पष्ट करण्यात आला आहे. मात्र राज्यातील विद्यापीठांमध्ये एटीकेटी असलेल्या विद्यार्थ्यांबाबत काय निर्णय घेणार? राज्यात सर्व विद्यापीठ मिळून ४० टक्के विद्यार्थी हे एटीकेटी असलेले आहेत. हे एटीकेटीचे विद्यार्थी हे नापास गृहीत धरले जातील. त्यामुळे त्यांचे वर्ष वाया जाण्याची शक्यता आहे याचा विचार केला आहे का असा सवाल अभाविपसारख्या संघटना आणि भाजपचे आमदार आशिष शेलार यांच्याकडून उपस्थित करण्यात आला आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून घेण्यात आलेल्या निर्णयात या विद्यार्थ्यांबद्दल काहीच स्पष्टता नसल्याने या विद्यार्थी पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.काही लोक जाणीवपूर्वक एटीकेटी व बॅकलॉग असलेल्या विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण केला जाण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र विद्यार्थ्यांनी या संभ्रमावस्थेला बळी न पडता धीर धरावा असे आवाहन शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री म्हणून उदय सामंत यांनी केले. याबाबतीत योग्य निर्णय , योग्य वेळी जाहीर करू. आपलायसाठी काय करायचे आहे यासाठीची चर्चा युद्धपातळीवर सुरु असून तो लवकरच जाहीर करू असे आश्वासन त्यांनी एका व्हिडिओद्वारे विद्यार्थ्यांना दिले आहे.

टॅग्स :शिक्षणशिक्षण क्षेत्र