मनोहर कुंभेजकर
मुंबई - गेल्या दिड वर्षा पासून मुंबईकाँग्रेसला अध्यक्ष नाही. वयाची 80 पार केलेले एकनाथ गायकवाड हे सध्या मुंबई काँग्रेसचे हंगामी अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. मुंबई आणि महाराष्ट्र प्रदेशचा अध्यक्ष बदलणार हे गेले वर्षभर काँग्रेस कार्यकर्ते ऐकत आहेत. मात्र अजूनही या दोन अध्यक्षपदांच्या नियुक्तीचा घोळ संपत नसल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याचे चित्र आहे.
बाळासाहेब थोरात यांना महाविकास आघाडीत मंत्रिपद दिल्यावर पूर्णवेळ संघटनेचे काम करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेशवर पक्षाने अध्यक्ष नेमलेला नाही. पक्षाची सर्वत्र पिछेहाट होत असतानाही काँग्रेसचे शिर्ष नेतृत्व स्वतःच पक्ष वाढीसाठी काही करू इच्छित नाही असा चुकीचा संदेश लोकांपर्यंत जात आहे.
महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील हे दोन दिवसांच्या दौऱ्यावर उद्या दि,2 व दि,3 रोजी मुंबईत येत आहेत. उद्या दुपारी 10 ते 1 पर्यंत ते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मध्ये ते राज्यातील दलित नेत्यांशी चर्चा करतील. तर दुपारी 5 ते रात्री 8 पर्यंत गांधी भवन येथे पालिकेच्या काँग्रेसच्या नगरसेवकांसोबत ते चर्चा करतील. रात्री 8 ते 9 यावेळेत ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी ते चर्चा करतील. तर गुरुवार दि,3 रोजी ते सकाळी 10 ते 1 मध्ये निमंत्रितांच्या भेटीगाठी घेतील.
महाराष्ट्र कॉंग्रेस चे प्रभारी एच. के. पाटील यांनी आत्ता पर्यंत 7-8 वेळा महाराष्ट्रात दौरा केलेला असून सर्व महत्वाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा देखील केली आहे. गेल्या ऑक्टोबरला व नंतर दिवाळीच्या दुसऱ्या दि,17 नोव्हेंबर रोजी त्यांनी मुंबईचा दौरा केला होता. यावेळी मुंबई काँग्रेसचे अध्यक्षपद व आगामी पालिका निवडणूकी विषयी त्यांनी काँग्रेसच्या मुंबईतील मान्यवर नेत्यांशी चर्चा देखिल केली होती. दि,19 रोजी एच. के. पाटील हे दिल्लीला जाऊन रिपोर्ट दिला. मात्र 2022 ची मुंबई महानगर पालिकेची महत्वाची निवडणूक असतांना अजूनही मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाची नियुक्ती जाहिर होत नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे.
उद्या पाटील हे मुंबईच्या दौऱ्यावर येत असून आता तरी मुंबई अध्यक्षपदाच्या नियुक्तीची घोषणा करणार का? असे काँग्रेसचे पदाधिकारी विचारत आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्ष पदासाठी विधानसभा अध्यक्ष नाना पाटोळे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची नावे तर मुंबई काँग्रेससाठी गेली 40 वर्षे काँग्रेस मध्ये कार्यरत असलेले डॉ. अमरजीत सिंग मनहास आणि कामगार नेते भाई जगताप यांची नावे चर्चेत आहेत. मनहास यांच्या नावावर एकमत झाल्याचे समजते.
काँग्रेसचे संकटमोचक अहमद पटेल यांच्या निधनाच्या 3-4 दिवसात जर पक्षाने नवीन खजिनदार नेमला तर संघटनेत मुंबई अध्यक्ष नेमायला किती वर्षे पाहिजे? अखिल भारतीय स्तरावर देखील अध्यक्ष नेमला नसल्याने 23 वरिष्ठ नेत्यांनी पत्र लिहिले आहे, तरी पक्ष अजून जुन्याच मगृरीत आहे असे पदाधिकाऱ्यांचे मत झाले आहे.
गुरुदास कामत यांचे निधन, प्रिया दत्त , मिलिंद देवरा यांचे पक्षात अलिप्त राहणे व काम न करणे, संजय निरुपम यांची सततची वादग्रस्त वक्तव्ये आणि त्यामुळे जुन्या जाणत्या वरिष्ठ लोकांनी काँग्रेस सोडणे तसेच प्रसिद्ध अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर यांनी ही आज काँग्रेसला सोडचिठ्ठी देणे यामुळे पक्ष रसातळाला जात आहे. तरीही पक्ष नेतृत्वाला अजून अध्यक्ष जाहीर करायला वेळ मिळत नाही यामुळे पक्षाची वाटचाल दिशाहीन होत असल्याचे मत माजी मंत्र्याने व्यक्त केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या तोडीस तोड़ व अनुभवी नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखा अभ्यासू नेता काँग्रेसकड़े असताना त्यांची महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी नियुक्ति पक्ष का करत नाही? असा प्रश्न सामान्य कार्यकर्ते विचारत आहेत.