मुंबई : भाजपने मुंबईतील तीनपैकी दोन जागा गमावल्याने पक्षाला मोठा धक्का बसला आहे. २०१९ मध्ये पक्षाचे तीन खासदार निवडून आले होते, त्यात यावेळी मोठी घट झाली. त्यातच आता मुंबई भाजपचे अध्यक्ष आ. आशिष शेलार यांनी दिलेल्या एका बाइटची निकालानंतर सोशल मीडियात जोरदार चर्चा आहे.
शेलार हे काही दिवसांपूर्वी वृत्त वाहिन्यांशी बोलताना असे म्हणाले होते की, उद्धव ठाकरेजी देशात भाजपच्या ४५ जागा येणार नाहीत असे तुम्ही म्हणता आणि समजा त्यापेक्षा अधिक जागा आल्या तर तुम्ही राजकारण सोडाल काय? माझे म्हणणे तुम्ही रेकॉर्ड करा. उद्धवजी! गेल्यावेळी (२०१९) तुम्ही आमच्यामुळे १८ जागांवर निवडून आलेला होता. तुम्ही मर्दांचा पक्ष चालवत असाल आणि मर्दांचे नेतृत्व करत असाल तर माझे तुम्हाला जाहीर आव्हान आहे की महाराष्ट्रात महाविकास आघाडी मिळून तुम्ही १८ जागा जिंकल्या तर मी राजकारण सोडेन, असे शेलार यांनी म्हटले होते.
मंगळवारच्या निकालात महाविकास आघाडीने राज्यात ३० जागा जिंकल्या. उद्धवसेनेला ९ जागा मिळाल्या असे नमूद करत अनेकांनी आशिष शेलार यांना ट्रोल केले. आता राजकारण कधी सोडणार शेलार साहेब! अशी विचारणा दिवसभर सोशल मीडियात होत होती.