मुंबई : मेट्रो प्रकल्पांना होणारा विलंब, प्रकल्पात होणारा वाढीव खर्च टाळणे आणि सर्व मेट्रो प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याला सर्वांत जास्त प्राधान्य देणार आहे, असा निर्धार नव्यानेच एमएमआरडीएच्या महानगर आयुक्तपदाचा पदभार स्वीकारलेल्या आर.ए. राजीव यांनी केला. एमएमआरडीएची सूत्रे स्वीकारल्यानंतर शुक्रवारी त्यांनी पहिल्यांदाच पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधला.पायाभूत सुविधांना, त्याच्या विकासासाठी सरकारतर्फे योग्य तो पाठिंबा मिळत आहे. मुंबईसारख्या शहराच्या विकासाकरिता असणारे मेट्रोचे प्रकल्प पाहता एमएमआरडीएच्या आयुक्तपदाचा काळ माझ्या कारकिर्दीतील सर्वांत जास्त आव्हानात्मक काळ आहे, असे आर. राजीव म्हणाले. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाविषयी बोलताना राजीव म्हणाले, पर्यावरण आणि विकास एकत्रितरीत्या होणे आवश्यक आहे. मात्र त्याचबरोबर हे प्रकल्प शहराला विकसित करण्याबरोबरच पर्यावरण वाचविण्यासाठी आहेत हे प्रत्येक मुंबईकराने लक्षात ठेवायला हवे. आपल्या आयुक्तपदाच्या कारकिर्दीत मेट्रो प्रकल्पांच्या बांधकामांमुळे पर्यावरणाला कोणतीही हानी होऊ देणार नाही, अशी ग्वाही आर.ए. राजीव यांनी दिली.भविष्यातील कामांविषयी बोलताना ते म्हणाले, मेट्रो प्रकल्पांना होत असलेल्या विलंबामुळे मुंबईकरांचा आरामदायी प्रवास होण्यास विलंब होतो आहे. मात्र, ही समस्या तत्काळ सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मेट्रोने जाहीर केलेले सर्व प्रकल्प दिलेल्या तारखांच्या आतच पूर्ण केले जातील याची त्यांनी ग्वाही दिली. मेट्रोने पर्यावरणाची प्रचंड हानी केली आहे. त्यावर उत्तर देताना आर.ए. राजीव यांनी काही गोष्टी स्पष्ट केल्या. ध्वनिप्रदूषण, वायुप्रदूषण आणि लोकांना होणारी असुविधा टाळण्याकरिता मुंबई महानगरपालिका, वाहतूक पोलीस आणि मेट्रो प्रकल्पांशी संबंधित असणाऱ्या सर्व सरकारी संस्थांशी समन्वय साधण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला जाईल, असे ते म्हणाले.तसेच सर्व मेट्रो प्रकल्प, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (शिवडी ते न्हावाशेवा), विरार-अलिबाग बहुउद्देशीय प्रकल्प याचबरोबर प्राधिकरणाने हाती घेतलेल्या सर्व प्रकल्पांचा लवकरात लवकर आढावा घेऊन प्रकल्प जलदगतीने प्रगतिपथावर नेण्याच्या दृष्टीने सर्वतोपरी प्रयत्न करेन, असा विश्वास आर.ए. राजीव यांनी या वेळी व्यक्त केला.
मेट्रो प्रकल्पांना होणारा वाढीव खर्च आणि विलंब टाळणार, आर.ए. राजीव यांचा निर्धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2018 7:02 AM