आर.के. स्टुडिओत पुढच्या वर्षी बाप्पा येणार का?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2018 03:14 AM2018-09-15T03:14:55+5:302018-09-15T06:24:50+5:30
बाप्पा पुढच्या वर्षी स्टुडिओत विराजमान होणार का, हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरित
- अजय परचुरे
मुंबई : सालाबादप्रमाणे या वर्षीही राज कपूर यांच्या चेंबूर येथील प्रसिद्ध आर.के. स्टुडिओत बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली. मात्र, कपूर कुटुंबीय हा स्टुडिओ लवकरच विकणार असल्याने पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या आर.के.स्टुडिओतील गणेशोत्सव पुढच्या वर्षी होईल की नाही, याबाबत कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम आहे. बाप्पा पुढच्या वर्षी स्टुडिओत विराजमान होणार का, हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरित असल्याने ते भावूक झाले आहेत.
आर. के. स्टुडिओ शोमॅन राज कपूर यांनी १९४८ साली चेंबूरमध्ये बांधला. गणपतीवर अगाध श्रद्धा असणाºया राज कपूर यांनी स्टुडिओ सुरू झाल्यानंतर पुढच्या काही वर्षांतच गणेशोत्सवात येथे बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यास सुरुवात केली. तेव्हापासून दरवर्षी न चुकता स्टुडिओत बाप्पा विराजमान होतात. त्यासाठी कपूर कुटुंबीयही आवर्जून हजेरी लावतात.
अभिनेते ऋषी कपूर यांच्याकडे सध्या आर. के. स्टुडिओची जबाबदारी आहे. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली. गणेश चतुर्थीच्या दिवशी ऋषी कपूर त्यांचे दोन्ही भाऊ रणधीर आणि राजीव कपूरसह बाप्पाच्या प्रतिष्ठापनेला हजर होते; पण त्यांच्यात दरवर्षीसारखा उत्साह नव्हता. आर. के. स्टुडिओतील कर्मचाºयांनीही नेहमीप्रमाणे जय्यत तयारी केली असली, तरी स्टुडिओतील हा शेवटचा गणेशोत्सव तर नसेल ना? असा प्रश्न प्रत्येकालाच सतावत आहे. त्यामुळे ते भावूक झाले आहेत.