हे फडणवीसांना तर पटेल काय? मोदींना कानपिचक्या, देवेंद्रांचे कान टोचले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2021 08:29 AM2021-05-21T08:29:37+5:302021-05-21T08:31:13+5:30
गुजरातला 1 हजार कोटी देणाऱ्या केंद्राने महाराष्ट्र आणि गोव्याच्या बाबतीत भेदभाव का करावा ? पंतप्रधान आईच्या ममतेने गुजरातेत गेले . तीच ममता महाराष्ट्राच्या वाटय़ाला थोडीफार आली असती तर वादळग्रस्तांच्या मनाला उभारी आली असती
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तौत्के चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी गुजरातला १ हजार कोटींची मदत देऊ केली. महाराष्ट्र आणि गोव्यातही वादळामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राला १५०० कोटींची मदत दिली पाहिजे, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले होते. त्यानंतर, आता शिवसेनेच्या मुखपत्रातून मोदींना लक्ष्य करण्यात आलं आहे. मोदी महाराष्ट्रालाही देतील! उगाच वाद कशाला?, असे म्हणत संपादकांनी मोदींना कानपिचक्या घेतल्या आहेत.
गुजरातला 1 हजार कोटी देणाऱ्या केंद्राने महाराष्ट्र आणि गोव्याच्या बाबतीत भेदभाव का करावा ? पंतप्रधान आईच्या ममतेने गुजरातेत गेले . तीच ममता महाराष्ट्राच्या वाटय़ाला थोडीफार आली असती तर वादळग्रस्तांच्या मनाला उभारी आली असती . मुख्यमंत्री ठाकरे आज कोकणच्या दौऱयावर निघाले आहेत . वादळाने लोकांच्या चुली भिजल्या व विझल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नक्कीच विझलेल्या चुली पेटविण्याचे बळ देतील. पंतप्रधान मोदी यांनी गुजरातला हजार कोटी दिले म्हणून बोटे मोडायचे कारण नाही . मुंबई दिल्लीश्वरांना अडीच लाख कोटी देत असते याचे भान ठेवून दिल्लीश्वर कोकणातील वादळग्रस्तांसाठी दोनेक हजार कोटी देतील अशी आशा बाळगायला काय हरकत आहे?, असा उपरोधाक्तमक टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
हे फडणवीसांना तरी पटेल काय?
महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे तत्काळ कोकणच्या दौऱ्यावर गेले. त्यांनी चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. जनता व अधिकाऱ्यांशी चर्चा केली. वादळग्रस्तांना राज्य सरकारने भरघोस मदत द्यावी अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली. हीच मागणी त्यांनी अधिक जोरकसपणे केंद्राकडेही केली पाहिजे. फडणवीस हे महाराष्ट्राचे आहेत. त्या नात्याने पक्ष वगैरे बाजूला ठेवून त्यांनी गुजरातच्या बरोबरीत महाराष्ट्राला आर्थिक पॅकेज मिळावे, असे मोदी साहेबांना सांगायला हवे. गुजरातला चोवीस तासांत हजार कोटी व महाराष्ट्राला काहीच नाही हा सापत्नभाव फडणवीस यांना तरी पटेल काय?
गावे उद्धवस्त, बोटीतील 40 जणांचा मृत्यू
तौकते वादळाने कोकण किनारपट्टीवरील गावेच्या गावे उद्ध्वस्त झाली. घरेदारे, रस्ते, जनावरे, शेती-बागांचे नुकसान झाले. वादळामुळे शेकडो विजेचे खांब कोसळले आहेत व कोकणातील अनेक गावे आजही अंधारात आहेत. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे जिल्हय़ातील आंबा, काजू, कोकम, नारळी-पोफळीची शेकडो झाडे उन्मळून पडली आहेत. किनारपट्टीवरील मच्छिमारांच्या नुकसानीचा अंदाज करता येत नाही. मच्छिमारांच्या नौका वाहून गेल्या किंवा फुटून-तुटून गेल्याने त्यांच्या पोटापाण्याचे साधनच हिरावले. मुंबईतील कोळीवाडय़ांनाही वादळाचा फटका बसला. वरळी, माहीम, वेसावे वगैरे भागातील कोळीवाडय़ांत आकांत झाला आहे. वादळाचा तडाखा मुंबईच्या अरबी समुद्रातील ऑइल फिल्डला बसला. मुंबई 'हाय'जवळील बोट दुर्घटनेत चाळीसच्या आसपास लोक बुडून मरण पावले. नौदलाने मदत केली नसती तर त्या दुर्घटनेचे वर्णन करायला शब्द कमी पडले असते. 75 कामगारांना तेथे जलसमाधी मिळाली असावी ही भीती आहेच