मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड येथील सभेतून निवडणूक आयोगावर जोरदार प्रहार केला. हा निवडणूक आयोग नसून चुना लावा आयोग असल्याचं ते म्हणाले. तसेच, बंडखोर आमदारांना लक्ष्य करताना, माझा बाप चोरणाऱ्यांनी स्वत:च्या वडिलांचा फोटो लावून, नाव घेऊन लोकांसमोर जावे, असे म्हटले. तर, भाजप नेत्यांवर निशाणा साधताना यापुढे केवल मोदींचा फोटो लावून महाराष्ट्रात मतं मागून दाखवा, असे चॅलेंजही उद्धव ठाकरेंनी दिली. खेडमध्ये उद्धव ठाकरेंच्या भाषणापूर्वी अनेक नेत्यांची भाषणं झाली. त्यावेळी, शिवसेना नेते अनंत गीते यांनी सर्वच उपस्थितांना शपथ दिली. या शपथेचा फोटो शेअर करत आता आदित्य ठाकरेंनीही बंडखोर आमदारांवर निशाणा साधलाय.
राज्यातील सत्तांतरानंतर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले. केवळ सत्ताच नाही तर उद्धव ठाकरे यांच्यावर शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गमावण्याची वेळ आली. शिवसेनेचे बहुतांश आमदार, खासदार हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. त्यामुळे पक्षसंघटना मजबूत करण्याचं मोठे आव्हान उद्धव ठाकरेंसमोर उभे राहिले. त्यात आता पक्षाला उभारी देण्यासाठी उद्धव ठाकरे राज्यभरात ठिकठिकाणी सभा घेत आहे. त्यातीलच पहिली सभा रत्नागिरीच्या खेड येथे पार पडली. आपल्या सभेत उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोग, केंद्र सरकार, बंडखोर आणि भाजपावर जोरदार निशाणा साधला. तत्पूर्वी अनंत गीते यांनी सर्व शिवसैनिक आणि शिवसेना नेत्यांना एकनिष्ठतेची आणि आजन्म शिवसैनिक राहण्याची शपथ दिली. या शपथेवेळी सर्वांनी दोन हात उंचावत वज्रमुठ बांधली होती. आदित्य ठाकरेंनी हाच फोटो शेअर करत बंडखोर आमदार आणि विरोधकांना लक्ष्य केलंय.
वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा, निश्चयाची वज्रमूठ आणि कट्टर शिवसैनिकांची साथ असताना अस्मानीच्या सुल्तानीला महाराष्ट्र पुरून उरणारच, मातीत गाडणारच!, असे ट्विट आदित्य ठाकरेंनी केलंय. खेड येथील सभेला आदित्य ठाकरे व्यासपीठावर दिसले नाहीत. मात्र, खेडच्या सभेनंतर शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर होत असलेल्या टीकेला आदित्य यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन उत्तर दिलंय.
उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन भाजपची टीका
"कालचं उद्धव ठाकरे यांचं भाषण म्हणजे ‘मला पाहा फुल वाहा’" असं म्हणत भाजपाने खोचक टोला लगावला आहे. तसेच "दुनिया सगळी वाईट... माझं बरोबर मीच चांगला हेच ठाकरेंच धोरण" असंही म्हटलं आहे. भाजपाचे नेते केशव उपाध्ये (BJP Keshav Upadhye) यांनी उद्धव ठाकरेंच्या भाषणावर टीका केली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "कालचं उद्धव ठाकरे यांचं भाषण म्हणजे ‘मला पाहा फुल वाहा’ लोकप्रतिनिधी वाईट कारण ते सोडून गेले. निवडणूक आयोग वाईट कारण त्यांनी निकाल दिला."
दरम्यान, अपेक्षेप्रमाणे या सभेतून उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आणि भाजपावर टीका केली. खेडच्या गोळीबार मैदानावर उद्धव ठाकरे यांची ही सभा झाली. सत्तासंघर्षानंतर पहिली जाहीर सभा झाली. हे मैदान तुडुंब भरलेले आहेत. रस्ते दोन्ही बाजूने तुडुंब भरलेले आहेत असा दावा माजी खासदार अनंत गीते यांनी केला.