Join us

नालेसफाईच्या कामावर छापा टाकणार!

By admin | Published: May 11, 2016 3:38 AM

गतवर्षी नालेसफाईचा घोटाळा उघड झाल्यामुळे पालिका आयुक्त अजय मेहता यांनी स्वत: या कामावर नजर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे़ त्यानुसार, पश्चिम उपनगरातील नाल्यांच्या सफाईची पाहणी

मुंबई: गतवर्षी नालेसफाईचा घोटाळा उघड झाल्यामुळे पालिका आयुक्त अजय मेहता यांनी स्वत: या कामावर नजर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे़ त्यानुसार, पश्चिम उपनगरातील नाल्यांच्या सफाईची पाहणी आज त्यांनी केली़ त्याचबरोबर, पुढच्या आठवड्यापासून मुंबईतील कोणत्याही नाल्यांवर अचानक छापा टाकून कामाची पाहणी करण्यात येईल, असा इशाराच त्यांनी दिला आहे़पावसाळ्यापूर्वी नाल्यांमधील ६० टक्के गाळ काढणे अपेक्षित आहे़ मात्र, नियोजित वेळेपेक्षा तीन महिने विलंबाने नाल्यांच्या सफाईला सुरुवात झाली़ गतवर्षी ठेकेदारांनी नाल्यांमधील गाळ काढून मुंबईबाहेर टाकण्यात अनियमितता केली होती़ असा सुमारे दीडशे कोटी रुपयांचा घोटाळा उघड झाल्याने आयुक्तांनी स्वत:च मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे़त्यानुसार, पश्चिम उपनगरातील नाल्यांची आज पाहणी करण्यात आली़ यामध्ये चमडावाडी नाला, सांताक्रुझ परिसरातील एअरपोर्ट नाला, विलेपार्लेचा श्रद्धानंद नाला, जोगेश्वरी पूर्वेचा मजास नाला व वाकोला नदीतील गाळ काढण्याच्या कामाची आयुक्तांनी आज पाहणी केली़ नालेसफाईच्या कामावर छापा टाकण्याच्या इशाऱ्याबरोबर, तसेच डेडलाइनप्रमाणे काम झालेच पाहिजे, असे अधिकाऱ्यांना त्यांनी ठणकावले आहे़ (प्रतिनिधी)>नालेसफाईचा गाळ टाकण्यासाठी मुंबईबाहेरील ग्रामपंचायतीचे बोगस ना हरकत प्रमाणपत्र देऊन ठेकेदारांनी पालिकेला फसवले. दीडशे कोटी रुपयांचा हा घोटाळा उघड झाल्यानंतर आयुक्त अजय मेहता यांनी ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची कारवाई सुरू केली़गाळ काढताना एकच वाहन एकाच वेळी दोन ठिकाणी दाखविण्यात येत होते़ वजनकाटा पावत्यांमध्ये घोळ आहे़ वजन काटा लॉगशिटमध्येही तफावत आढळून आली होती़या प्रकरणी पालिकेने ३८ कोटी रुपयांच्या या गैरव्यवहाराप्रकरणी ३२ ठेकेदारांना काळ्या यादीत टाकले आहे़, तर १३ कर्मचारी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे़