तुला लवकरच थोबडवणार; मनसेची जान कुमार सानूला थेट धमकी
By कुणाल गवाणकर | Published: October 28, 2020 12:02 PM2020-10-28T12:02:35+5:302020-10-28T12:05:59+5:30
bigg boss 14 MNS: मराठीचा अपमान करणाऱ्या जान कुमार सानूला मनसेचा थेट इशारा
मुंबई: गायक जान कुमार सानूला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं थेट धमकी दिली आहे. मला मराठी भाषेची चीड येते, असं विधान जान कुमार सानूनं बिग बॉसमध्ये केलं. यावरून महाराष्ट्र चित्रपट सेनेनं आक्रमक भूमिका घेतली आहे. मुंबईत राहून आता तुझं करिअर कसं बनतं जान सानू तेच बघतो मी, असा थेट इशारा मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी दिला आहे.
बिग बॉसच्या १४ व्या हंगामात निक्की तांबोळी आणि जान कुमार सानू यांच्यात वाद झाला. त्यावेळी निक्की तांबोळी मराठीत बोलत होती. त्यावरून जाननं राग व्यक्त केला. मला मराठी भाषेची चीड येते, असं जाननं म्हटलं. यावरून आता मनसेनं आक्रमक भूमिका घेत जानला थेट इशारा दिला आहे. 'जान कुमार सानू... मराठी भाषेची याला चीड येते म्हणे. अरे तू कीड आहेस मोठी... मुंबईतून हाकलून देण्यासाठी मी नॉमिनेट करतोय याला,' अशा शब्दांत खोपकर यांनी संताप व्यक्त केला आहे.
जान कुमार सानू... मराठी भाषेची याला चीड येते म्हणे. अरे तू कीड आहेस मोठी... मुंबईतून हाकलून देण्यासाठी मी नाॅमिनेट करतोय याला.
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) October 28, 2020
'मुंबईत राहून तर आता तुझं करिअर कसं बनतं जान सानू तेच बघतो आता मी. लवकरच तुला स्वत:ची चीड येईल ही माझी गॅरंटी. तुला थोबडवणार लवकरच आता आम्ही मराठी,' असा थेट इशारा खोपकर यांनी दिला आहे. 'कलर्ससारख्या वाहिनीने खरंतर हा सीन वगळायला हवा होता, पण एडिट केलं नाही ते बरं झालं, गद्दारांची तोंडं कशी असतात ते समजलं,' असं खोपकर यांनी ट्विटमध्ये पुढे म्हटलं आहे.
मुंबईत राहून तर आता तुझं करिअर कसं बनतं जान सानू तेच बघतो आता मी.लवकरच तुला स्वत:ची चीड येईल ही माझी गॅरंटी. तुला थोबडवनार लवकरच आता आम्ही मराठी.
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) October 28, 2020
आणि कलर्ससारख्या वाहिनीने खरंतर हा सीन वगळायला हवा होता, पण एडिट केलं नाही ते बरं झालं, गद्दारांची तोंडं कशी असतात ते समजलं.
कोण आहे जान कुमार सानू?
जान कुमार सानूचं मूळ नाव जयेश भट्टाचार्य आहे. तो प्रसिद्ध गायक कुमार सानू यांचा मुलगा आहे. संगीत क्षेत्रात वडिलांच्या पावलावर पाऊल टाकायचं असल्यानं मी माझ्या नावापुढे त्याचं नाव लावतो, असं जाननं टेलिग्राफला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं.