BEST Bus Strike: बोनसचा तिढा कायम; सणासुदीत बेस्ट कर्मचारी संपावर?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2018 01:07 AM2018-11-02T01:07:02+5:302018-11-02T06:42:54+5:30
बेस्टकडे पैसेच नसल्याने बोनस देणार कुठून? बेस्टकडे पैसे छापण्याची मशीन आहे का, असा खोचक सवाल करीत महाव्यवस्थापकांनी कर्मचाऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले. यामुळे संतप्त बेस्ट समिती सदस्य आक्रमक झाल्यामुळे आजची बैठक गुंडाळण्यात आली.
मुंबई : आगामी अर्थसंकल्पही तुटीत असल्याने बेस्ट उपक्रमाने या वर्षीही कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. याउलट बेस्टकडे पैसेच नसल्याने बोनस देणार कुठून? बेस्टकडे पैसे छापण्याची मशीन आहे का, असा खोचक सवाल करीत महाव्यवस्थापकांनी कर्मचाऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले. यामुळे संतप्त बेस्ट समिती सदस्य आक्रमक झाल्यामुळे आजची बैठक गुंडाळण्यात आली. परिणामी, बोनसबाबत निर्णय घेण्यासाठी उद्या पुन्हा बेस्ट समितीची बैठक बोलाविण्यात आली आहे.
दरम्यान, बोनस न झाल्यास कर्मचारी ऐन दिवाळीच्या दिवशी सोमवारपासून आंदोलन करतील, असा इशारा कामगार नेते व बेस्ट समिती सदस्य सुहास सामंत यांनी दिला आहे. महापालिकेच्या कर्मचाºयांना १५ हजार रुपये सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले आहे. मात्र बेस्ट उपक्रमातील ४१ हजार कर्मचाºयांची दिवाळी या वर्षीही अंधारातच आहे. गेले काही दिवस कामगारांना बोनस देण्याबाबत बेस्ट समितीमध्ये मागणी होत होती. मात्र बेस्ट उपक्रमाकडे पैसाच नसल्याने यंदा बोनस देणे शक्य नाही, असे स्पष्ट करीत महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे यांनी आपले हात वर केले आहेत. परंतु महापालिकेला कर्जापोटी उर्वरित २२ कोटी रुपये रक्कम न देता बोनससाठी वळती करावी, अशी मागणी बेस्ट समिती सदस्यांनी केली. यावर कर्मचाºयांना बोनस देण्याबाबत पालिका आयुक्तांबरोबर चर्चा करणार असल्याचे महाव्यवस्थापक यांनी सांगितले. महाव्यवस्थापक कोणतेच ठोस आश्वासन देत नाहीत हे पाहून आयुक्तांबरोबर चर्चा नंतर करा, आधी बोनस जाहीर करा, असे बेस्ट समिती अध्यक्ष आशिष चेंबूरकर यांनी ठणकावत बेस्ट समितीची बैठक गुंडाळली. तर महाव्यवस्थापकांनी इटलीला जाण्याआधी कर्मचाºयांना बोनस देण्याचा निर्णय जाहीर करावा. अन्यथा सोमवारी कर्मचारी आंदोलन करतील आणि महाव्यवस्थापकांना दौरा रद्द करावा लागेल, असा इशारा सुहास सामंत यांनी बेस्ट समितीमध्ये दिला.
दिवाळीपूर्वी पगार हातात
आर्थिक संकटात असल्याने कर्मचाऱ्यांचे दर महिन्याचे वेतन काढणेही बेस्टला अवघड जात आहे. त्यामुळे या वर्षी बोनस देण्याबाबतही प्रशासनाने असमर्थता दर्शविली आहे. मात्र प्रत्येक महिन्यात १५ तारखेला होणारा पगार या महिन्यात दिवाळीपूर्वीच म्हणजे १ नोव्हेंबरलाच कर्मचाºयांच्या हातात पडला आहे.
सणासुदीत बेस्ट संपावर?
बेस्ट कर्मचाºयांना बोनस मिळावा, अशी मागणी बेस्ट समिती आणि कामगार संघटनांनी लावून धरली आहे. मात्र बोनस न मिळाल्यास सोमवारपासून कर्मचारी आंदोलन करतील, असा इशारा कामगार नेते सुहास सामंत यांनी दिला आहे. रक्षाबंधनाच्या दिवशीही बेस्ट कामगार संपावर गेल्याने मुंबईकरांचे हाल झाले होते.