Join us

वर्षाअखेर बेस्टकडे स्वतःच्या फक्त ५०० बस उरणार? वाढत्या तोट्यामुळे उपक्रम खड्ड्यात - बेस्ट कामगार सेना 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 1:52 PM

बसचे आयुर्मान संपल्यामुळे डिसेंबर २०२४अखेर बेस्टच्या स्वत:च्या मालकीच्या बसेसची संख्या १,०४७ वरून ५०० वर येणार आहे. 

मुंबई : मुंबईकरांची दुसरी जीवनवाहिनी असलेल्या बेस्ट उपक्रमाचा तोटा आता १२ हजार ९९३.५५ कोटी रुपयांवर गेला आहे. मात्र, हा तोटा भरून काढण्यासाठी ना सरकारकडून, ना पालिकेकडून काही कार्यवाही होत आहे. बसचे आयुर्मान संपल्यामुळे डिसेंबर २०२४अखेर बेस्टच्या स्वत:च्या मालकीच्या बसेसची संख्या १,०४७ वरून ५०० वर येणार आहे. 

 त्याशिवाय ‘हंसा’ कंपनीने बेस्टला ३०० बसेसचा पुरवठा बंद करण्याचा इशारा दिला आहे, तर ‘एमपी ग्रुप’ कंपनीने ३०० कंपन्यांचा बस पुरवठा आधीच बंद केला आहे. बसची संख्या घटत असल्याने काही दिवसांनी ४५ लाख प्रवाशांच्या प्रवासाचा प्रश्न निर्माण होणार आहे. बेस्टचा अर्थसंकल्प पालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करून बेस्ट उपक्रम वाचवावा, अशी मागणी बुधवारी शिवसेनाप्रणीत बेस्ट कामगार सेनेने केली आहे.

मुंबई महापालिका अधिनियम १८८८ कलम १२६ नुसार बेस्टचा अर्थसंकल्प महापालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करण्याचा ठराव बेस्ट समिती, पालिका सभागृहाने मंजूर केला असतानाही पालिका आयुक्त आणि नगरविकास विभाग अंतिम निर्णय घेत नसल्याने हा परिवहन उपक्रम अक्षरश: खड्ड्यात गेल्याची टीका बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी बुधवारी  पत्रकार परिषदेत केली. मागील काही वर्षांत राजकीय इच्छाशक्तीअभावी बेस्टचे खासगीकरण झाल्याचा आरोपही त्यांनी केला. कंत्राटदार कंपन्यांकडून बस पुरवण्यात येत नसल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. दुसरीकडे ३५ वर्षे सेवा करून निवृत्त झालेल्या शेकडो कर्मचाऱ्यांची देणी थकल्याने त्यांचे जगणे कठीण झाल्याचे त्यांनी सांगितले.

वातानुकूलित मिनी बस बंद बेस्टच्या ताफ्यात भाडेतत्त्वावरील २८० वातानुकूलित मिनी बसगाड्या होत्या. या बसेस मरोळ, दिंडोशी, ओशिवरा आगारातून पश्चिम उपनगरात चालवण्यात येत होत्या. मात्र, कंत्राटदाराने या बस १२ ऑक्टोबरपासून चालवणे बंद केले आहे. आर्थिक समस्यांमुळे या बसेसची सेवा देऊ शकत नसल्याचे कंत्राटदाराने उपक्रमाला कळविले. यामुळे एकूण बसगाड्यांपैकी पश्चिम उपनगरातील नऊ टक्के बसेस ताफ्यातून कमी झाल्या आहेत. त्यात एसी डबल डेकर, सिंगल डेकर, नॉन एसी सिंगल डेकर बसेस, २८ आसनी मिडी बस आहेत. 

...अशा आहेत मागण्या-     बेस्टने स्वमालकीचा बसचा ताफा ३,३३७ पर्यंत राखावा. यासाठी पालिकेने निधी द्यावा.-     बेस्टमधील विद्युत पुरवठा विभागात आवश्यक मनुष्यबळ कायमस्वरूपी तत्त्वावर करा.-     ‘बेस्ट’च्या ३७० एकर जागेसह इतर संपूर्ण मालमत्तेचे बेस्टने संरक्षण करावे.-     २,५०० अनुकंपा वेटिंगवर असणाऱ्यांची भरती करावी. सेवानिवृत्तांच्या वारसांना नोकरी द्यावी.-     बेस्टमधील कंत्राटी बसवाहक - चालकांना प्रतीक्षा यादीवर घेऊन नोकरीत सामावून घ्यावे.-     सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देणी तातडीने द्यावीत. 

टॅग्स :बेस्टमुंबई