मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या लोकल बंद आहे, तसेच इंधन दरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची कोंडी झाली आहे, पण लवकरच किफायतशीर पर्याय उभा राहणार आहे. मुंबईसह महानगर प्रदेशात बाईक टॅक्सी सुरू करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे.
कोरोना रुग्ण संख्येत घट होत आहे. त्यामुळे दैनंदिन व्यवहार वेगाने सुरू करण्यासाठी राज्य सरकार आग्रही आहे. राजकीय गाठीभेटींनाही वेग आला आहे. हे करताना सरकारने सर्वसामान्य नोकरदार वर्गाला कामावर पोहोचण्यासाठी स्वस्त आणि जलद प्रवासी वाहतूक असलेल्या मुंबई लोकलमध्ये प्रवेश करण्यास बंदी घातली. यामुळे सध्या बनावट ओळखपत्र आणि मजल दरमजल करत प्रवासी कार्यालय गाठत आहेत.
खासगी बाईक टॅक्सी कंपनीने मुंबईसह राज्यातील प्रमुख शहरांत ही सुविधा देण्यासाठी प्रस्ताव सादर केला आहे. मुंबई, पुणे, नाशिकसह राज्यातील निवडक शहरांत प्रवासी वाहतूक करण्याकरिता बाईक टॅक्सी सुरू करावी, असा प्रस्ताव आहे. मात्र, यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. सध्या या प्रकरणी अधिक बोलणे योग्य ठरणार नाही, असे परिवहन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
बाईक टॅक्सीवर झालेली कारवाई
रॅपिडो आणि उबेर कंपनीने यापूर्वी मुंबईत बाईक टॅक्सी सेवा सुरू केली होती. मात्र, परवानगी नसल्याचे सांगत प्रादेशिक परिवहन कार्यालयांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार संबंधित चालकांवर गुन्हे नोंदवण्यात आले होते. देशातील अन्य राज्यांत बाईक टॅक्सीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामुळे मुंबईत नेमकी बाईक टॅक्सी केव्हा धावणार याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.