भाजपा विधानसभेप्रमाणे लढणार का?
By admin | Published: January 28, 2017 03:14 AM2017-01-28T03:14:49+5:302017-01-28T03:14:49+5:30
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारीच स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर केल्यानंतर शिवसेना कार्यकर्ते आनंदात आहेत.
दीप्ती देशमुख / मुंबई
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारीच स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर केल्यानंतर शिवसेना कार्यकर्ते आनंदात आहेत. सध्या भाजपा व सेनेमध्ये वारंवार खटके उडत असल्याने दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना युती नकोच असल्याचे वातावरण आधीपासून होते. मात्र आता युती तुटल्याचे महापालिकेच्या निवडणुकीत चांगलेच पडसाद उमटणार आहेत. ‘एन’ वॉर्डमध्येही भाजपा आणि शिवसेनेची लढत चुरशीची ठरणार आहे. विधानसभेतील कामगिरीची पुनरावृत्ती भाजपा करणार की शिवसेना त्यांना एन वॉर्डमध्ये रोखणार, हा आता कळीचा मुद्दा आहे.
‘एन’ वॉर्डात मराठी, गुजराती समाज बहुसंख्य आहे. त्याखालोखाल मुस्लीम व उत्तर भारतीय समाजाची मतेही निर्णायक ठरणार आहेत. परंतु, खासदार आणि दोन्ही आमदार भाजपाचे असल्याने भाजपा एन वॉर्डवर वर्चस्व मिळवण्यासाठी संपूर्ण क्षमता पणाला लावणार हे स्पष्टच आहे.
घाटकोपर पश्चिम विभागात मराठी, मुस्लीम व उत्तर भारतीय मतदार अधिक आहेत. तर गुजराती समाज तुलनेने कमी आहे. तथापि, घाटकोपर पूर्व विभागात हे चित्र वेगळे आहे. या विभागात गुजराती समाज बहुसंख्य आहे. त्यापाठोपाठ मराठी व मुस्लीम समाजाचा क्रमांक लागतो. त्यामुळे ‘एन’ वॉर्डामध्ये रणनीती आखताना भाजपा-सेनेची चांगलीच दमछाक होणार आहे.
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत या वॉर्डामध्ये भाजपाला सर्वाधिक मते मिळाली होती. त्याखालोखाल शिवसेना व काँग्रेसचा नंबर होता. परंतु, हे समीकरण आताही कायम राहील का? हे पाहणे महत्त्वाचे आहे. महापालिका निवडणुकीमुळे स्थानिक समस्या आणि स्थानिक नेते अधिकाधिक मते खेचण्याची शक्यता असल्याचे या विभागातील जाणकारांचे म्हणणे आहे.
घाटकोपर पूर्व व पश्चिम विभागात पाण्याची समस्या कमी झालेली आहे. मात्र झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन, अनधिकृत झोपडपट्ट्यांना आळा घालणे, सांडपाण्याचा निचरा करणे इत्यादी समस्यांकडे स्थानिक उमेदवारांना लक्ष घालावे लागेल. त्याशिवाय झोपडपट्ट्यांतील प्रभागांतून आश्वासक स्थानिक चेहरा निवडणुकीत उभा करणे, हेच पक्षांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे.
स्थानिक खासदार आणि दोन्ही आमदार भाजपाचे असल्याने भाजपाला हा वॉर्ड राखणे प्रतिष्ठेचे बनले आहे. तर मराठी मतांच्या आशेवर हा वॉर्ड खेचून घेण्याची रणनीती सेना आखत आहे. त्यामुळे या वॉर्डमध्ये २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्षांची काय स्थिती होती, हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते.