अंध-अपंगांची लॉटरी रेंगाळणार?

By admin | Published: November 24, 2014 01:25 AM2014-11-24T01:25:42+5:302014-11-24T01:25:42+5:30

उच्च न्यायालयाने अंध व अपंगांसाठी राखीव घरांची लॉटरीची प्रक्रिया नोव्हेंबरपर्यंत सुरू करण्याचे आदेश दिले असले, तरी म्हाडाने त्याची केवळ शब्दश: अंमलबजावणी करण्यावर भर दिला आहे.

Will the blind-disabled looter linger? | अंध-अपंगांची लॉटरी रेंगाळणार?

अंध-अपंगांची लॉटरी रेंगाळणार?

Next

जमीर काझी, मुंबई
उच्च न्यायालयाने अंध व अपंगांसाठी राखीव घरांची लॉटरीची प्रक्रिया नोव्हेंबरपर्यंत सुरू करण्याचे आदेश दिले असले, तरी म्हाडाने त्याची केवळ शब्दश: अंमलबजावणी करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये सोडत होण्याच्या आशेवर असलेल्यांना आणखी काहीकाळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. या घटकासाठीच्या लॉटरीसाठी प्रत्यक्षात नव्या वर्षात जानेवारीचा पहिला पंधरवडा उजाडावा लागणार आहे. हिवाळी अधिवेशनापूर्वी म्हणजे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात त्याबाबतची जाहिरात काढली जाईल, असे म्हाडातील सूत्रांकडून सांगण्यात आले.
या प्रवर्गातील घरांच्या निश्चित किमती आणि गतिमंदत्व व मनोविकृती अर्जदारांसाठीच्या उत्पन्न व पालकत्वाबाबत अद्याप निश्चिती करण्यात आलेली नाही. येत्या आठवड्यात त्याबाबत निर्णय घेतला जाईल आणि लॉटरी घेण्याच्या दृष्टीने ही प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे न्यायालयाला कळविण्यात आल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
हायकोर्टाने दिलेल्या आदेशानुसार म्हाडाच्या मुंबई व कोकण मंडळांच्या ६६ घरांसाठी लॉटरी काढली जाणार आहे. मुंबईतील २०११ व १२ सोडतीतील ४९ आणि कोकण मंडळातील २०११ च्या सोडतीतील १७ घरांचा समावेश आहे. पाच वर्षांपूर्वी अपंग व अंधाच्या सवर्गाबाबत दाखल झालेल्या याचिकेबाबत आॅक्टोबरमध्ये निकाल देताना ३० नोव्हेंबरपर्यंत लॉटरीची प्रक्रिया राबविण्याचे आदेश दिले होते.
अंध व अपंग संवर्गाबाबतच्या नियमाविरोधात २००९ मध्ये उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. त्यामुळे दोन वर्षांतील लॉटरीतील घरे राखीव ठेवण्यात आली होती़ न्यायालयाने या संवर्गामध्ये आता नव्याने निश्चित केलेल्या विविध ७ प्रवर्गांतील व्यक्ती त्यासाठी पात्र ठरविले असून त्यामध्ये पूर्ण अंध, कमी दृष्टी, कुष्ठरोगमुक्त, कर्णबधिर, अवयवातील कमतरता, गतिमंदत्व आणि मनोविकृती या प्रवर्गांचा समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार गेल्या वर्षापासून म्हाडाची लॉटरी काढण्यात येत आहे. आता प्रलंबित ठेवलेल्या दोन वर्षांतील घरांची सोडत काढावयाची आहे. मुंबई मंडळांच्या दोन वर्षांतील एकूण ४९ व कोकण मंडळाच्या २०११च्या सोडतीतील मीरा रोड येथील १७ घरांचा समावेश आहे. मुंबईतील घरे ही अत्यल्प, अल्प, मध्यम व उच्च उत्पन्न वर्गातील आहेत तर कोकण मंडळाची अत्यल्प व अल्प गटातील घरे आहेत.

Web Title: Will the blind-disabled looter linger?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.