बॉलिवूड कलाकार यूपीमध्ये डाकू बनायला जाणार का? शिवसेनेचा योगींना खरमरीत सवाल
By बाळकृष्ण परब | Published: December 2, 2020 08:06 PM2020-12-02T20:06:58+5:302020-12-02T20:13:28+5:30
Bollywood Mumbai News : बॉलिवूडच्या धर्तीवर उत्तर प्रदेशमध्ये फिल्मसिटी निर्माण करण्याची घोषणा करणाऱ्या योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई दौऱ्यामुळे सध्या महाराष्ट्रातील राजकारण पेटून उठले आहे.
मुंबई - बॉलिवूडच्या धर्तीवर उत्तर प्रदेशमध्ये फिल्मसिटी निर्माण करण्याची घोषणा करणाऱ्या योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई दौऱ्यामुळे सध्या महाराष्ट्रातील राजकारण पेटून उठले आहे. योगींकडून सुरू असलेल्या बॉलिवूड कलाकारांच्या भेटीगाठींमुळे शिवसेना आणि महाविकास आघाडीमधील पक्ष आक्रमक झाले आहेत. शिवसेनेचे नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री गुलाबराव पाटील यांनी या मुद्द्यावरून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना खरमरीत सवाल विचारला आहे.
बॉलिवूड मुंबई सोडून उत्तर प्रदेशमध्ये का जाईल? बॉलिवूडवाले उत्तर प्रदेशमध्ये डाकू बनायला जाणार का? मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. तसेच कुणीही बॉलिवूडला मुंबईतून बाहेर नेऊ शकत नाही, असा टोला गुलाबराव पाटील यांनी लगावला आहे.
Why will Bollywood go to Uttar Pradesh? Are they going to to be dacoits? Mumbai is the commercial capital of the country and no one can take Bollywood away from Mumbai: Maharashtra Minister Gulab Patil pic.twitter.com/GuxmSOFgmf
— ANI (@ANI) December 2, 2020
यावेळी गुलाबराव पाटील यांनी उत्तर प्रदेशपेक्षा मुंबई ही खूप सुरक्षित असल्याचेही स्पष्टपणे सांगितले. उत्तर प्रदेशमध्ये दिवसाढवळ्या दरोडे पडतात. तिथे सुरक्षितता आहे का? अशा परिस्थितीत उत्तर प्रदेशसारख्या राज्यात गुंतवणूक करणे कितपत सुरक्षित ठरेल. अशा वातावरणामुळे मुंबईसारखे शहर सोडून बॉलिवूड उत्तर प्रदेशात जाईल असे वाटत नाही, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, मुंबईच्या दौऱ्यावर आलेल्या योगी आदित्यनाथ यांनीही बॉलिवूड आणि फिल्मसिटीच्या मुद्द्यावरून शिवसेनेला टोला लगावला होता. आम्ही नवी फिल्मसिटी उभारतोय, इतर लोक चिंतेत का?; असा सवाल योगी आदित्यनाथ यांनी शिवसेनेला विचारला होता. "बॉलिवूडची फिल्मसिटी घेऊन जाण्याचा काही प्रश्नच नाही. फिल्मसिटी ही खुली प्रतिस्पर्धा आहे. प्रत्येक राज्याला प्रगती करण्याचा हक्क आहे. आम्ही जागतिक सुविधा देणारी नवी फिल्मसिटी उभारणार आहोत. त्यामुळे इतरांनी चिंता करण्याचं कारण नाही", असा टोला योगी आदित्यनाथ यांनी शिवसेनेला लगावला होता.
नोएडात १ हजार हेक्टरवर उभी राहणार फिल्मसिटी
उत्तर प्रदेशचे कॉर्पोरेट हब म्हणून ओळख मिळवलेल्या नोएडामध्ये नवी फिल्मसिटी उभारण्यात येणार आहे. यासाठी १ हजार हेक्टर इतकी जागा निश्चित करण्यात आल्याचं योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं. नवी फिल्मसिटी आग्रा, मथुरा आणि दिल्लीहून प्रवासासाठी सोयीस्कर ठरेल असं सांगतानाच या फिल्मसिटीत आम्ही जागतिक दर्जाच्या सुविधा देण्याचा प्रयत्न करणार असल्याचं आदित्यनाथ म्हणाले.