कामातील दिरंगाईमुळे शिवसेनेचे स्वप्न भंगणार?
By admin | Published: October 28, 2016 04:09 AM2016-10-28T04:09:51+5:302016-10-28T04:09:51+5:30
मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्राणिसंग्रहालय उभारण्याच्या शिवसेनेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला ग्रहण लागले आहे. सरकारी लालफितीचे अडथळे पार करत, या प्रकल्पावर
मुंबई : मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्राणिसंग्रहालय उभारण्याच्या शिवसेनेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला ग्रहण लागले आहे. सरकारी लालफितीचे अडथळे पार करत, या प्रकल्पावर काम सुरू होण्यास दशक लोटले. मात्र, निवडणुकीपूर्वी नूतनीकरणाचे काम मार्गी लागेल असे वाटत असताना, आता पेंग्विनच्या मृत्यूमुळे पुन्हा वादळ उठले आहे. या कामात झालेल्या दिरंगाईमुळे प्रकल्पाची डेडलाइनही संपत असल्याने, शिवसेनेचे स्वप्न भंग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिका या ठेकेदाराला बाहेरचा रस्ता दाखवणार आहे.
भायखळ््यातील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव २००७ मध्ये शिवसेनेने आणला. प्राणिमित्र संघटनाचा विरोध, सेंट्रल झू-आॅथोरिटीची करडी नजर आणि खर्चात कपात असे विघ्न पार करत, हा प्रकल्प आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. आगामी महापालिका निवडणुकीत या प्रकल्पाचे श्रेय घेण्याची तयारी शिवसेनेने केली आहे. त्यात पेंग्विन या परदेशी पाहुण्यांच्या आगमनाने शिवसेनेची कॉलर टाइट झाली होती, परंतु गेल्या रविवारी एका पेंग्विनच्या मृत्यूने शिवसेनेचे धाबे दणाणले आहेत. विरोधी पक्ष पेंग्विनच्या आडून शिवसेनेवर निशाणा साधत आहेत. त्यामुळे हे प्रकरण मिटवण्यासाठी राणीची बाग सुसज्ज करण्याचा दबाव शिवसेनेकडून पालिका प्रशासनावर टाकला जात आहे.
त्यानुसार, हायवे इन्फ्रा अँड कन्स्ट्रक्शन या ठेकेदाराला पेंग्विनसाठी असलेले विशेष पिंजरे लवकरात लवकर बांधून देण्यास बजावण्यात आल्याचे समजते. हे काम झाल्यानंतर या कंपनीच्या जागी नवीन ठेकेदार नेमण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
- २००७ मध्ये शिवसेनेने राणी बागेच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव आणला. त्या वेळी या प्रकल्पाची किंमत चारशे कोटी रुपये होती.
- २०१२पर्यंत या प्रकल्पात तत्कालीन आयुक्त सुबोध कुमार यांनी त्यात कपात करून दीडशे कोटींवर आणला. या प्रकल्पात आणखी ३० कोटी रुपयांची कपात करण्यात आली आहे.
- वर्षभरापूर्वी नेमल्या या कंपनीच्या जागी आता नवीन ठेकेदार नेमण्यात येणार आहे, यासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. ५० कोटींमध्ये पेंग्विनसाठीचा खर्च, मत्स्यालयाचे काम, तसेच अन्य प्राण्यांच्या पिंजऱ्यासाठी ६७ कोटींचे काम आहे.
- पेंग्विनच्या पिंजऱ्याचे काम जेमतेम ३० टक्के झाले आहे. त्यामुळे पालिका निवडणुकीपूर्वी हे काम पूर्ण होणे अवघड आहे. त्यामुळे डिसेंबर २०१६ पर्यंत काम पूर्ण करण्यास ठेकेदाराला बजावले आहे.