Join us

बस संघटना संप मागे घेणार? प्रवेश बंदी स्थगितीच्या लेखी आदेशामुळे नरमाईचे धोरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2017 3:20 AM

अवजड वाहने व खासगी बसेसच्या मुंबई शहरात दिवसा प्रवेश बंदीच्या निर्णयाला दहा दिवसांसाठी स्थगिती दिल्याचे वाहतूक पोलिसांनी शनिवारी लेखी पत्र जाहीर केले.

मुंबई : अवजड वाहने व खासगी बसेसच्या मुंबई शहरात दिवसा प्रवेश बंदीच्या निर्णयाला दहा दिवसांसाठी स्थगिती दिल्याचे वाहतूक पोलिसांनी शनिवारी लेखी पत्र जाहीर केले. त्यामुळे येत्या १८ व १९ सप्टेंबरला संपाचा इशारा दिलेल्या मुंबई बस संघटनेने नरमाईचे धोरण घेत संप मागे घेण्याची भूमिका घेतली आहे. याबाबत रविवारी बैठक होणार असून, त्यामध्ये अंतिम निर्णय घेतला जाईल.मुंबई वाहतूक पोलिसांनी शुक्रवारी प्रवेश बंदीच्या निर्णयाला दहा दिवसांची स्थगिती जाहीर केली. मात्र त्याबाबत लेखी आदेशाशिवाय माघार न घेण्याचा निर्णय संघटनेने घेतला होता. आता तसे लेखी पत्र दिल्याने रविवारी सायन येथील नित्यानंद सभागृहात सकाळी ११.३० वाजता याबाबत बस संघटनेची तातडीची बैठक होणार आहे. या बैठकीत संप तात्पुरता मागे घेण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे संकेत मिळाले आहेत.सोमवारी पुन्हा चर्चा- शहरातील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी खासगी बस आणि अवजड वाहनांना दिवसा ‘शहर प्रवेशबंदी’ हा उपाय वाहतूक पोलिसांनी केला होता. या निर्णयानुसार बसवर कारवाई करण्यात आली होती. संघटनेने संप पुकारताच वाहतूक पोलिसांनी १० दिवस कारवाई थांबवण्याचे आदेश दिले.- या वेळी अवजड वाहने आणि खासगी बस यांच्या मागण्या व अडचणी जाणून घेण्यासाठी संघटनेच्या शिष्टमंडळाला १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता चर्चेसाठी बोलावले आहे. वाहतूक पोलीस विभागाचे सह पोलीस आयुक्त शिष्टमंडळाशी चर्चा करणार आहेत.

टॅग्स :मुंबई