...तर दीनानाथ नाट्यगृहातील प्रयोग रद्द करू!, निर्माता संघाचा व्यवस्थापनाला कडक इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 07:13 AM2022-06-15T07:13:09+5:302022-06-15T07:13:43+5:30

विले पार्ले येथील दीनानाथ नाट्यगृहाचे भाडे महानगर पालिकेच्या वॉर्ड ऑफिसमध्ये जाऊनच भरण्याच्या निर्णयामुळे नाट्यकर्मी नाराज झाले आहेत.

will cancel the shows at Dinanath Natyagriha a strong warning to the management from drama producer team | ...तर दीनानाथ नाट्यगृहातील प्रयोग रद्द करू!, निर्माता संघाचा व्यवस्थापनाला कडक इशारा

...तर दीनानाथ नाट्यगृहातील प्रयोग रद्द करू!, निर्माता संघाचा व्यवस्थापनाला कडक इशारा

Next

संजय घावरे

मुंबई :

विले पार्ले येथील दीनानाथ नाट्यगृहाचे भाडे महानगर पालिकेच्या वॉर्ड ऑफिसमध्ये जाऊनच भरण्याच्या निर्णयामुळे नाट्यकर्मी नाराज झाले आहेत. या विरोधात जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघाने आवाज उठवत वॉर्ड ऑफिसमध्ये भाडे भरण्यास नकार दिला असून, जर हा नियम मागे घेतला नाही तर दीनानाथ नाट्यगृहातील प्रयोग रद्द करू असे व्यवस्थापनाला पत्राद्वारे ठणकावून सांगितले आहे. 

१३ जून २०२२ पासून दीनानाथ नाट्यगृहाचे भाडे महानगर पालिकेच्या वॉर्ड ऑफिसमध्ये भरण्याचा नियम लागू केल्याने निर्मात्यांची तारांबळ उडाली. याबाबत निर्माता संघ किंवा कोणत्याही निर्मात्याला विश्वासात घेण्यात आले नव्हते, तसेच पूर्वसूचनाही देण्यात आलेली नव्हती असे निर्मात्यांचे म्हणणे आहे. या निर्णयामुळे १३ जून रोजी 'लपवा छपवी' या नाटकाचा प्रयोग विलंबाने सुरू झाला. प्रयोगापूर्वी तासभर अगोदर नाट्यगृहात पोहोचलेले निर्माते शेखर दाते यांना नाट्यगृहाचे दरवाजे उघडून देण्यास नकार देण्यात आला. प्रथम वॉर्ड ऑफिसमध्ये जाऊन नाट्यगृहाचे भाडे भरा असे व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. त्यामुळे 'लपवा छपवी'च्या संपूर्ण टिमला नाट्यगृहाच्या दारातच खोळंबत उभे रहावे लागले. अंधेरीतील वॉर्ड ऑफिसमध्ये जाऊन भाडे भरल्याचे चलान निर्मात्यांनी दाखवल्यावरच 'लपवा छपवी'च्या टिमला नाट्यागृहात प्रवेश देण्यात आला. त्यानंतर सेटपासून लाईट्सपर्यंत सर्व जुळवाजुळव करण्यासाठी विलंब झाल्याने प्रयोग वेळेवर सुरू होऊ शकला नाही. यावर वॉर्ड ऑफिसमध्ये जाऊन भाडे न भरण्याची आपली भूमिका जागतिक मराठी रंगधर्मी निर्माता संघाने पत्र पाठवून व्यवस्थापनाला कळवले आहे. संघाचे कार्यवाह नाट्यनिर्माते दिलीप जाधव यांच्या स्वाक्षरीचे पत्र दीनानाथच्या व्यवस्थापनाला देण्यात आले आहे.

निर्माता संघाने उपस्थित केलेले मुद्दे - 
- नाट्यगृहाकडे निर्मात्यांची २०-२५ हजार अनामत रक्कम जमा असताना वॉर्ड ऑफिसमध्ये भाडे भरायला सांगणे चुकीचे आहे.
- महानगर पालिकेच्या इतर नाट्यगृहांचे भाडे तिथेच स्वीकारले जात असताना दीनानाथसाठीच ही सक्ती करण्यात येऊ नये.
- एखाद्या हाऊसफुल्ल कार्यक्रमाचे किंवा नाटकाचे भाडे वॉर्डमध्ये भरले गेले नाही आणि जर प्रेक्षकांनी हुल्लडबाजी केल्याने नाट्यगृहाचे नुकसान झाल्यास निर्माता हमी घेणार नाही.
- वॉर्डमध्ये भाडे भरण्याचा नियम मागे न घेतल्यास दीनानाथ नाट्यगृहामध्ये प्रयोग न करण्याबाबतही नाट्यनिर्माता संघ विचार करेल.
- नियम मागे न घेतल्यास नाईलाजाने दीनानाथमधील प्रयोग रद्द करावा लागला तर वर्तमानपत्रांमध्ये जाहिरात देऊन प्रेक्षकांची क्षमा मागितली जाईल.
- या निर्णयामुळे निर्मात्यांना वॉर्ड ऑफिसमध्ये लांबलचक रांग लावून पैसे भरावे लागणार आहेत.
- शनिवार-रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी वॉर्ड ऑफिस बंद असताना भाडे भरताना अडचणी येणार आहेत.
- वॉर्ड ऑफिसमधील गर्दीमुळे कार्यालयीन वेळेत भाडे भरले न गेल्यास ऐनवेळी प्रयोग रद्द करण्याची नामुष्की निर्मात्यांवर ओढवणार आहे.
- करंट बुकिंगद्वारे जमा झालेल्या रकमेतून नाट्यगृहाचे भाडे भरणाऱ्या निर्मात्यांना आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागणार आहे.

नाट्यगृहाचे भाडे वॉर्डमध्ये जाऊन भरण्याच्या नियमामुळे खूप धावपळ झाली. सायंकाळी चार वाजण्याच्या प्रयोगासाठी आम्ही तीन वाजता नाट्यगृहावर पोहोचलो, पण व्यवस्थापिका ऋतुजा फातर्पेकर यांनी आत प्रवेश नाकारला. ५९०० रुपये भाडे भरल्याचे चलान दाखवल्यावर ३ वाजून ४० मिनिटांनी नाट्यगृहात प्रवेश देण्यात आला. यामुळे झालेल्या मन:स्तापामुळे नाटकाचा प्रयोग रद्द करण्याच्या निर्णयापर्यंतही पोहोचलो होतो, पण प्रयोग रद्द केल्यास अनामत रकमेतून भाडे वसूल करण्यात येईल असे व्यवस्थापनाकडून सांगण्यात आल्याने प्रचंड धावपळ करून प्रयोग करावाच लागला.
- शेखर दाते (निर्माते लपवा छपवी)

अतिरीक्त आयुक्त किशोर गांधी यांनी या नियमावर बोट ठेवल्याने दीनानाथ नाट्यगृहामध्ये प्रयोग करणाऱ्या निर्मात्यांना मन:स्ताप आणि धावपळीला सामोरे जावे लागत आहे. १२ जूनपर्यंत दीनानाथमध्येच भाडे स्वीकारले जायचे. आता मात्र वॉर्ड ऑफिसमध्ये पैसे भरून चलान दाखवल्याखेरीज नाट्यगृहाचे दरवाजे उघडणार नाहीत. नुकत्याच झालेल्या नाट्यनिर्माता संघाच्या सभेमध्ये या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. त्यानंतर पत्राद्वारे दीनानाथ नाट्यगृहाकडे आमचे म्हणणे पोहोचवले आहे. नाट्यगृहाकडे सर्व निर्मात्यांचे डिपॅाझीट जमा असूनही अशा प्रकारे निर्मात्यांची अडवणूक करणे चुकीचे आहे.
- श्रीपाद पद्माकर (नाट्यनिर्माते)

Web Title: will cancel the shows at Dinanath Natyagriha a strong warning to the management from drama producer team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Natakनाटक