आरे येथील वादग्रस्त मेट्रो- ३ चे कारशेड हलणार?; ठाकरे सरकारकडून सकारात्मक हालचाली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2020 01:25 AM2020-08-29T01:25:06+5:302020-08-29T01:25:38+5:30
मुख्यमंत्री, नगरविकास, पर्यावरण मंत्री यांच्यामध्ये चर्चा : कॉर्पोरेशनकडून माहिती देण्यास कोणीच उपलब्ध नाही
मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या देशातील पहिल्यावहिल्या भुयारी मेट्रो-३ च्या आरे येथील कारशेडच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झाला असतानाच आता हे वादग्रस्त कारशेड दुसरीकडे हलविण्याची चर्चा सुरू झाली आहे.
शुक्रवारी मेट्रो प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासोबत झालेल्या मेट्रो अधिकाऱ्यांच्या बैठकीत मेट्रो-३ चे कारशेड गोरेगाव येथील पहाडी भागात हलविता येईल का? याबाबत चर्चा झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
दरम्यान, याबाबत ‘लोकमत’ने मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडे विचारणा केली. मात्र कॉर्पोरेशनकडून याबाबत कोणीही उत्तर दिले नाही. गोरेगाव येथील आरे कॉलनीमध्ये मेट्रो-३ चे कारशेड उभारण्याच्या मुद्द्यावरून मोठा वाद निर्माण झाला. या प्रकरणी आरे येथील पर्यावरणवाद्यांनी केलेल्या विरोधानंतरही कॉर्पोरेशनने आपले काम सुरू ठेवले. विशेषत: निवडणुकांदरम्यान हा मुद्दा गाजत असतानाच येथील पर्यावरणवाद्यांनी आजी, माजी सरकारला येथील झाडांची कत्तल करू नये, अशी विनंती केली होती. मात्र येथील काम सुरूच होते. आता येथील झाडांची कत्तल सुरू असतानाच आरेमधील कारशेड गोरेगाव येथील पहाडी भागात हलविता येईल का? याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
जेव्हा ठाकरे सरकार राज्यात बसले होते तेव्हा पहिल्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरे येथील मेट्रोच्या कारशेडला स्थगिती दिली होती.शिवाय पाच सदस्य समिती नेमली होती. आणि आरेऐवजी दुसरी जागा कारशेडसाठी निवडण्यात यावी, असे सुचविले होते. दरम्यान, यापूर्वीच आरे कॉलनीमधील १६५ हेक्टर क्षेत्र संवेदनशील क्षेत्रातून वगळण्यात येऊ नये म्हणून वनशक्ती या सामाजिक संस्थेतर्फे दाखल करण्यात आलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती. परिणामी, कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो-३ च्या कारशेडवरून यापूर्वी वादात सापडलेली आरे कॉलनी पुन्हा एकदा चर्चेत आली.
काय झाले होते?
मुंबई महापालिकेतल्या वृक्ष प्राधिकरणाने आरे येथील झाडे तोडण्यास परवानगी दिली.
आरेमध्ये मेट्रो कारशेडच्या बांधणीसाठी २७०० झाडांची कत्तल करण्यात आली.
सामान्य जनतेला आणि पर्यावरणप्रेमींना ही बाब लक्षात येताच जनआंदोलन सुरू केले.
आरे येथील कारशेड दुसºया जागेत हलविण्याबाबत मंत्रालयात झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली, असे आमच्या कानावर आले. मात्र आमच्याकडे असे काहीच लेखी आलेले नाही. मात्र सरकार जर असा विचार करत असेल किंवा याबाबत सकारात्मक चर्चा करत असेल तर आम्ही याचे स्वागत करत आहोत. - डी. स्टॅलिन, प्रकल्प संचालक, वनशक्ती