मुलांचे बरेवाईट झाल्यावरच CCTV लावणार का? विद्यार्थ्यांच्या सुरक्षेमुळे पालकांमध्ये संताप

By सीमा महांगडे | Published: August 25, 2023 01:37 PM2023-08-25T13:37:57+5:302023-08-25T13:37:57+5:30

खासगी शाळांत सीसीटीव्ही, मग पालिकेच्या शाळांमध्ये का नाही?

Will CCTV be installed only after any bad incidence Parents questions about students safety | मुलांचे बरेवाईट झाल्यावरच CCTV लावणार का? विद्यार्थ्यांच्या सुरक्षेमुळे पालकांमध्ये संताप

मुलांचे बरेवाईट झाल्यावरच CCTV लावणार का? विद्यार्थ्यांच्या सुरक्षेमुळे पालकांमध्ये संताप

googlenewsNext

सीमा महांगडे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: लहान मुलांच्या सुरक्षिततेसाठी राज्यात प्रत्येक खासगी शाळेत जूनपासून सीसीटीव्ही सक्तीचा केला असून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये वर्षभरात ते लावण्यात येतील, अशी घोषणा गतवर्षी मार्च महिन्यात माजी शिक्षणमंत्र्यांनी केली. मात्र दीड वर्ष उलटूनही अद्याप राज्यातच काय मुंबईतील महानगरपालिका शाळांमध्येही सीसीटीव्ही बसविलेले नाहीत. महानगरपालिका शाळांतील सीसीटीव्हीसाठी प्रशासकीय मान्यता मिळाली असली त्याच्या निविदा प्रक्रियेला मात्र काही मुहूर्त मिळेना. यामुळे पालिका शाळांतील विद्यार्थ्यांची सुरक्षितता सध्या तरी वाऱ्यावरच आहे.

बुधवारी क्रीडाशिक्षकाकडून विद्यार्थिनींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पालिका शाळांमध्ये सीसीटीव्ही  नसल्यामुळे मुंबईतील गरीब आणि दुर्लक्षित घटकांतील मुलांच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोणाची, असा प्रश्न पालक विचारू लागले आहेत.

खासगी शाळांत सीसीटीव्ही, मग पालिकेच्या शाळांमध्ये का नाही?

शिक्षण विभागाच्या माहितीनुसार मुंबईतील ५० टक्क्यांहून अधिक खासगी शाळांमध्ये सीसीटीव्ही असून पालिका शाळांमध्ये निधीची तरतूद दोन वर्षांपूर्वीच्या अर्थसंकल्पात होती. गतवर्षी शिक्षण विभागाच्या सूचनेनंतर त्यावर कार्यवाही होऊन आता पालिकेच्या ४७७ इमारतींमधील १ हजार १४६ महानगरपालिका शाळांसाठी सीसीटीव्हीची तरतूद प्रस्तावित आहे.

आजूबाजूला घडत असलेल्या घटना पाहता व विद्यार्थ्यांची शाळेतील सुरक्षा याचा गांभीर्याने विचार करता घेतलेल्या निर्णयाची कडक अंमलबजावणी होणे खूप महत्त्वाचे आहे. यात कोणतीही हयगय न करता प्राधान्याने सर्व शाळेत सीसीटीव्ही चालू दिसायला हवेत याची काळजी घ्यायला हवी. सुरक्षेच्या बाबतीत इतकी दिरंगाई  विद्यार्थ्यांची हेळसांड करण्याचा हा प्रकार ठरणार आहे.
- सुशील शेजुळे, समन्वयक, मराठी शाळा संस्थाचालक संघ

सीसीटीव्हीच्या मंजुरीची तरतूद झाली आहे आणि फाइल अर्थ विभागाकडे आहे. येत्या ८ दिवसांत काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्यानंतर त्याची निविदाप्रक्रिया सुरू होईल आणि पुढील काही महिन्यांत सीसीटीव्ही बसविण्याचे कामही होईल. आम्ही काम हाती घेतले आहे.
- राजेश कंकाळ, शिक्षणाधिकारी

Web Title: Will CCTV be installed only after any bad incidence Parents questions about students safety

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.