मुंबई : मुंबईत कोरोनाची रुग्णसंख्या नियंत्रणात येत असली तरीदेखील यंदा दहीहंडी सणावर कोरोनाचे सावट कायम आहे. त्यामुळे यंदाची दहीहंडी आम्ही उत्साहात साजरी करूच मात्र गोविंदांच्या आरोग्याला कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होईल असे कृत्य करणार नसल्याचे गोविंदा पथकांचे मत आहे. दहीहंडीच्या दिवशी मुंबई व आसपासच्या परिसरात लाखोंची बक्षिसे लावून दहीहंडी चे भव्य आयोजन करण्यात येते. मात्र अशावेळी गर्दी जमुन संसर्गाचा धोका वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे अजून एक वर्ष कळ काढू व पुढच्या वर्षी त्याच उत्साहात, धूमधडाक्यात दहीहंडी साजरी करू, असे गोविंदा पथकांचे म्हणणे आहे. महाराष्ट्राला मदत कार्याची गरज आहे. अतिवृष्टीमुळे कोकण व पश्चिम महाराष्ट्रात जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यातून नागरिक अजूनही सावरत आहेत. त्यामुळे अनेक गोविंदा पथकांचा पूरग्रस्त नागरिकांच्या मदत कार्यावरच भर असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आधी मदत कार्य मगच दहीहंडीची तयारी असे गोविंदा पथकांचे म्हणणे आहे.राज्यात कोरोनाचे संकट अजूनही टळलेले नाही. त्यामुळे यंदाही दहीहंडी साधेपणाने साजरी करण्यात येईल. दहीहंडीच्या दिवशी सरावाच्या ठिकाणी नारळ फोडून जागे वाल्याला कोरोना संकट टळावे यासाठी गाऱ्हाणे घालण्यात येईल व पुढच्या वर्षी मोठ्या उत्साहात दहीहंडी साजरी केली जाईल.- शार्दुल म्हाडगुत, सचिव, नयन फाउंडेशन गोविंदा पथकयावेळी दहीहंडी पथकातील बाळ गोपाळांनी महाड पूरपरिस्थितीचे भान लक्षात घेऊन महाड येथे श्रमदान करण्याची तयारी दाखवली. त्यानुसार २५ गोविंदांची टीम कोकणात श्रमदान करून आली. यंदा परिस्थितीचे भान लक्षात ठेवून दहीहंडी साधेपणाने साजरी करण्यात येईल.- कल्पेश मढवी, बळसेवा मित्र मंडळ, गोविंदा पथक
दहीहंडी साजरी करू, गोविंदांच्या आरोग्याशी खेळ करणार नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2021 10:21 AM