Join us

वाहन विम्यात केंद्र सरकार करणार बदल?

By admin | Published: March 18, 2015 1:24 AM

केंद्र सरकारकडून वाहन विम्याच्या मदतनिधीत कपात करण्यात येणार असल्याचा आरोप करत मुंबई आॅटोरिक्षा-टॅक्सीमेन युनियन प्रस्तावित बदलांना विरोध केला आहे.

मुंबई : केंद्र सरकारकडून वाहन विम्याच्या मदतनिधीत कपात करण्यात येणार असल्याचा आरोप करत मुंबई आॅटोरिक्षा-टॅक्सीमेन युनियन प्रस्तावित बदलांना विरोध केला आहे. अपघातग्रस्त वाहन चालकाला विमा कंपनीकडून मिळणाऱ्या निधीत कपात करून कपात केलेली रक्कम अपघात झालेल्या व्यक्तीकडून वसूल करण्याची तरतूद प्रस्तावित बदलांत असल्याचे मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांनी सांगितले.राव म्हणाले की, प्रस्तावित बदलांचा सर्वाधिक फटका सर्वसामान्य नागरिकांसोबतच रिक्षा आणि टॅक्सी चालकांना बसणार आहे. कारण प्रस्तावित बदलांमध्ये अपघात झालेली व्यक्ती दंडाची रक्कम भरू शकली नाही, तर त्याला तुरूंगवासाची शिक्षा भोगावी लागणार आहे. गरीब टॅक्सी आणि रिक्षा चालक लाखो रुपयांचे दंड भरूच शकत नाहीत. त्यामुळे तुरूंगवासाशिवाय त्यांच्यासमोर पर्याय नसेल. शिवाय त्यांच्या गाडीचा अपघात झाल्यास समोरच्या व्यक्तीने नुकसानभरपाई भरली नाही, तर त्यांचा रोजगार ठप्प होऊ शकतो. सर्वसामान्य व्यक्तीलाही नुकसान भरपाई मिळाली नाही, तर त्याचे कुटुंबाचे नुकसान होणार आहे. याउलट विमा कंपन्यांचा मात्र यामध्ये कोट्यवधी रुपयांचा फायदा होणार आहे. दरम्यान, मुंबईतील अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात संघटनेने पोलीस, वाहतूक पोलीस आणि परिवहन अधिकाऱ्यांवर पुन्हा एकदा भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. संघटनेचे सरचिटणीस शंकर साळवी यांनी ७ एप्रिलला वांद्रे पूर्व येथील परिवहन आयुक्तांच्या कार्यालयावर उपनगरांतील रिक्षा आणि टॅक्सी चालक-मालक मोर्चा घेऊन धडकणार असल्याचे सांगितले. साळवी म्हणाले की, अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने, त्यांची वेळ आणि ठिकाण अशी सर्वच माहिती संघटनेने प्रशासनाला दिलेली आहे. मात्र अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे प्रशासनाला जाब विचारण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. यानंतरही प्रशासनाने ठोस भूमिका घेतली नाही, तर कृती समितीतर्फे रिक्षा चालक-मालक बंद पुकारतील, असा इशाराही साळवी यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)