- हरीश गुप्तानवी दिल्ली : अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या राममंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ५ ऑगस्ट रोजी होणार आहे. या समारंभाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र निमंत्रण आल्यास ते निश्चित उपस्थित राहतील, असे शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी सांगितले.
भूमिपूजन समारंभाला उपस्थित राहण्यासाठी रा. स्व. संघ, भाजपच्या नेत्यांबरोबरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही निमंत्रण दिल्याचे कळते. शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, राममंदिर उभारले जावे यासाठी आम्ही पहिल्यापासून प्रयत्न केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारला मार्च महिन्यात शंभर दिवस पूर्ण झाल्यानंतर त्यांनी अयोध्येला भेट दिली होती. तो एक ऐतिहासिक प्रसंगच होता, असेही ते म्हणाले. महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने होत असलेली वाढ तसेच तेथील राजकीय स्थिती पाहाता अयोध्येमध्ये भाजप व रा. स्व. संघाच्या नेत्यांबरोबर भूमिपूजनाला उपस्थित राहण्याबाबत उद्धव ठाकरे यांनी आपला निर्णय अद्याप गुलदस्त्यातच ठेवला आहे, असे राजकीय निरीक्षकांना वाटते.
मात्र आपण स्वमतानुसारच निर्णय घेतो, असा संदेश राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसला देण्याकरिता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भूमीपूजनाला जातीलही असे काही राजकीय निरीक्षकांना वाटत आहे. भूमिपूजन समारंभाचे निमंत्रण भाजप नेते लालकृष्ण अडवाणी, उमा भरती, मुरली मनोहर जोशी यांनाही देण्यात येणार आहे. गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हेही उपस्थित राहतील. सुमारे 300 जण समारंभाला हजर राहतील, अशी अपेक्षा आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादी अस्वस्थ
राममंदिराचे भूमिपूजन व अन्य घडामोडींमुळे काँग्रेसही अस्वस्थ आहे. राममंदिराच्या भूमिपूजनाने कोरोनाची साथ नष्ट होणार नाही, अशी कोपरखळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारली होती. देश कोरोनाशी झुंजत असताना मोदी राममंदिराच्या मुद्द्यामध्ये व्यग्र आहेत असेही पवार म्हणाले होते. उद्धव ठाकरे त्या समारंभाला जाण्याबाबत काय निर्णय घेतात याकडे काँग्रेस, राष्ट्रवादीचे लक्ष लागले आहे.
रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने खासदार खा. राऊत यांनाही निमंत्रण दिल्याचे कळते. शिवसेनेचे नेते व माजी केंद्रीय मंत्री अरविंद सावंत म्हणाले की, राममंदिर हे आमचे स्वप्न असून ते आता पूर्ण होणार आहे. राममंदिर उभारले जावे ही शिवसैनिक म्हणून आमचीही इच्छा आहे. त्यामुळे या मंदिराच्या भूमिपूजन समारंभाला आम्ही न जाण्याचा प्रश्न येतोच कुठे? मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सर्व परिस्थितीचा साकल्याने विचार करून योग्य तो निर्णय घेतील.
सर्व शंकराचार्यांना बोलवा
पंतप्रधान मोदी भूमिपूजनाला जाणार असतील, तर देशातील सर्व शंकराचार्यांनाही त्या समारंभाचे निमंत्रण द्या, अशी मागणी काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी केली.