Join us

वाढलेली मते चौकीदाराला मिळणार की मुंबईच्या पोरीला?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2019 4:04 AM

उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघात काँग्रेसच्या उर्मिला मातोंडकर आणि भाजपचे गोपाळ शेट्टी यांच्यात चुरस आहे.

सचिन लुंगसे

उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघात काँग्रेसच्या उर्मिला मातोंडकर आणि भाजपचे गोपाळ शेट्टी यांच्यात चुरस आहे. महत्त्वाचे म्हणजे २९ एप्रिल रोजी पार पडलेल्या निवडणुकीत शहर आणि उपनगरातील सहा मतदारसंघापैकी उत्तर मुंबई या लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक म्हणजेच ६० टक्के मतदान झाले. परिणामी मतदानाचा वाढलेला हा टक्का कुणाच्या पथ्यावर पडणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.काँग्रेसने येथून बॉलीवुडचा चेहरा असलेल्या उर्मिला मातोंडकर यांना संधी दिल्याने सर्वांचेच लक्ष या मतदारसंघाकडे आहे. तर दुसरीकडे गेल्या निवडणुकीत चार लाख मतांनी आघाडीवर असलेल्या गोपाळ शेट्टी यांना या वेळी नेमकी कीती मते मिळणार? त्यांचे मताधिक्य कायम राहणार की उर्मिला मताधिक्यास सुरुंग लावणार? अशा अनेक चर्चांनी हा मतदार संघ आता ढवळून निघाला आहे.

उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी एकेकाळी या मतदारसंघावर पाचवेळा ‘अधिराज्य’ गाजवले. मात्र २००४ साली काँग्रेसचे उमेदवार आणि बॉलीवूड अभिनेते गोविंदा यांनी त्यांचा पराभव केला. २००९ साली काँग्रेसचे उमेदवार संजय निरुपम यांना ‘लोक’मताने कौल दिला. तर २०१४ च्या निवडणुकीत मात्र विजयाचे वारे भाजपच्या बाजूने फिरले आणि भाजपाचे गोपाळ शेट्टी चार लाखांच्या मताधिक्याने निवडून आले.

आता २०१९ च्या निवडणुकीत उत्तर मुंबईतील मतदानाची टक्केवारी ६० टक्के इतकी नोंदविण्यात आली. २०१४ साली ती ५३.०७ एवढी होती. गतलोकसभेच्या तुलनेत यंदा मतदानाचा टक्का सहा टक्क्यांनी वाढला आहे. त्यामुळे वाढलेले हे मतदान नक्की विजेता कोण? हे ठरविणार आहे.

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघापैकी बोरीवलीत सर्वाधिक म्हणजे ६६ टक्के मतदान झाले आहे. तर दहिसर येथे ६२, मागाठाणे ५७, कांदिवली ५५, चारकोप ६० आणि मालाड येथे ५६ टक्के मतदानाची नोंद झाली. विधानसभा मतदारसंघांचा इतिहास पाहता येथील उच्चभ्रू वस्त्यांमध्ये गोपाळ शेट्टी यांचे प्राबाल्य आहे.

प्रचार आणि प्रसाराच्या दिवसांचा विचार करता उर्मिला यांनी मालाड, कांदिवली, बोरीवलीसह उर्वरित विधानसभा मतदार संघात तुफान बॅटिंग केली आहे. मात्र असले असले तरी येथील जुना, जाणता मतदार आणि राजकीय विश्लेषकांच्या मते गोपाळ शेट्टी यांना पराभूत करणे काँग्रेसला तूर्तास तरी शक्य नाही. कारण बहुमताच्या जोरावर आलेल्या गोपाळ शेट्टी यांनी येथे प्रचंड काम करत नागरिकांची मने जिंकली आहेत. येथील सामाजिक आणि आर्थिक गणिते जर पाहिली तर हा फॅक्टर निर्णायक असणार आहे. याव्यतीरिक्त मनसे फॅक्टरही निर्णायक ठरणार आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते उर्मिला या शेट्टी यांचे मताधिक्य कमी करू शकतात. परंतु प्रत्यक्षात मतदानाची वाढलेली टक्केवारी पाहता वाढलेले मतदान कुणाच्या पथ्यावर पडणार? हाच खरा आता औत्सुक्याचा विषय असून, याचा निकाल २३ मे रोजी लागणार आहे.

२०१४ च्या निवडणुकीदरम्यान उत्तर मुंबई मतदारसंघात १७ लाख ८३ हजार ८७० मतदार होते. त्यापैकी ९ लाख ४६ हजार ७१७ मतदारांनी मतदान केले होते. त्यावेळी ५३.०७ टक्के मतदान झाले होते. २०१९ लोकसभेदरम्यान झालेल्या मतदानाची टक्केवारी पाहता एकूण मतदारांची संख्या १६ लाख ४७ हजार २०८ आहे. म्हणजे गत लोकसभेच्या तुलनेत यावेळी मतदारांची संख्या घटली आहे. आणि या वेळी ९ लाख ८८ हजार २५२ मतदारांनी मतदान केले आहे. परिणामी घटलेल्या मतदारांची एकूण संख्या आणि झालेले मतदान कोणाच्या पथ्यावर पडणार? हे निकालानंतरच स्पष्ट होईल.

टॅग्स :लोकसभा निवडणूकमुंबई उत्तर