मुंबई - शिवसेनेच्या ४० च्या आसपास आमदारांनी केलेली बंडखोरी आणि राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्याचे दिलेले आदेश यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या काऊंटडाऊनला सुरुवात झाल्याने मानण्यात येत आहे. दरम्यान, बहुमत चाचणीला सामोरे जाऊन सत्ता गमावण्याची नामुष्की ओढवू नये, म्हणून उद्धव ठाकरे हे त्याआधीच राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.
आज होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबाद विमानतळाचे संभाजीनगर असे नामकरण करण्याचा प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. या प्रस्तावावरून मंत्रिमंडळाच्या बैठकीत खडाजंगी होऊ शकते. शिवसेना नेते आणि मंत्री अनिल परब यांनी तसा प्रस्ताव मांडण्यात येणार असल्याचे काल सांगितले होते. दरम्यान, या प्रस्तावाला काँग्रेसकडून विरोध होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करून मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. तसे झाल्यास राज्यातील समिकरणे पुन्हा बदलू शकतात. तसेच हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून बंड करणाऱ्या एकनाथ शिंदे गटालाही शह मिळू शकतो.
दरम्यान, काल रात्री भाजपा नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यपालांची भेट घेत महाविकास आघाडी सरकार अल्पमता असल्याचा दावा केला होता. त्यानंतर आज राज्यपालांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारला उद्या बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बहुमत चाचणील सामोरे न जाताच राजीनाम द्यावा, असा विचार शिवसेनेमधून मांडण्यात येत आहे. तर महाविकास आघाडीचे प्रणेते शरद पवार यांनी मात्र बहुमत चाचणीला सामोरे जावे असा सल्ला दिला आहे.