Join us

कोल्डमिक्स टिकेल का?; पालिका तयारीत, पण पावसाने वाहून जाण्याची भीती 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2023 1:01 PM

खड्डे बुजविण्यासाठी पालिकेने २०१७ पासून कोल्डमिक्सचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. सुरुवातीला पालिकेने ऑस्ट्रेलियातील महागडे कोल्डमिक्स तंत्रज्ञान साहित्य मागविले होते

मुंबई - खड्डेमुक्त मुंबईसाठी पालिका यंदाही कोट्यवधींचा खर्च करत असून दुसरीकडे पावसाळ्यात खड्डे बुजविण्यासाठी कोल्ड मिक्स बनविण्याची तयारी पालिकेने सुरू केली आहे. पालिकेच्या अस्फाल्ट प्लांटमध्ये दरवर्षी जवळपास ३ हजार २०० मेट्रिक टन कोल्डमिक्सचे उत्पादन होते. आतापर्यंत १०० हून अधिक मेट्रिक टन कोल्ड मिक्स तयार आहे. उर्वरित कोल्ड मिक्स उत्पादनाची तयारीही सुरू आहे.

दरम्यान, पावसाळ्यात रस्त्यावर पडलेले खड्डे कोल्ड मिक्स वापरून बुजविले जात असले तरी पावसाने ते कोल्डमिक्स वाहून पुन्हा खड्डे पडल्याचाच अनुभव मुंबईकरांचा आहे. त्यामुळे खड्ड्यांसाठी वापरण्यात येणाऱ्या कोल्डमिक्स बाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. खड्डे बुजविण्यासाठी पालिकेने २०१७ पासून कोल्डमिक्सचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. सुरुवातीला पालिकेने ऑस्ट्रेलियातील महागडे कोल्डमिक्स तंत्रज्ञान साहित्य मागविले होते. मात्र, या कोल्डमिक्सचा पाहिजे तितका परिणाम दिसला नाही. शिवाय ते महागडेही असल्याने पालिकेने स्वतः कोल्डमिक्स उत्पादन तयार करण्याचा निर्णय घेतला.

कोल्डमिक्स जे बाहेरून आयात करण्यात येत होते, त्याची किंमत प्रतिकिलो १७० रुपये असल्याने ते महागात पडत होते. त्यामुळे पालिकेने वरळी येथील (अस्फाल्ट) डांबर प्लांटमध्ये कोल्डमिक्सचे उत्पादन केल्याने ते पालिकेला प्रतिकिलो स्वस्त दरात उपलब्ध होते. पावसाळ्यापूर्वी, पावसाळ्यात व पावसाळ्यानंतर खड्डे बुजविण्यासाठी कोल्डमिक्सचा वापर केला जातो. मात्र, अनेकवेळा कोल्डमिक्स पहिल्याच पावसात वाहून जात असल्याचे समोर आले आहे.  

कोल्डमिक्सला मागणी का ? खड्ड्यांचा अंदाज घेऊन कोल्डमिक्सचा वापर करण्यासाठी अंदाजाप्रमाणे तेवढा भाग बाजूला केला जातो. यानंतर हवेच्या प्रचंड दाबाच्या मदतीने खड्डा स्वच्छ केला जातो आणि नंतर कोल्डमिक्स टाकून रोलिंग त्यावर केले जाते. नंतर साधारणतः अर्धा ते एका तासात रस्ता वाहतुकीसाठी खुला करता येतो. यामुळे खड्डे बुजविण्यासाठी कोल्डमिक्स तंत्रज्ञानाला वॉर्डनिहाय मागणी असल्याची माहिती आहे.

प्रति वॉर्ड मागणीनुसार वितरण कोल्डमिक्सचे वितरण मागील वर्षी पावसाळ्यातील खड्डे बुजविण्यासाठी २४ वॉर्डांकडून ३ हजार ९९ मेट्रिक टन ‘कोल्डमिक्स’ची मागणी केली होती. यंदाही मागणीनुसार जवळपास ७० टक्के कोल्डमिक्सचे वितरण पावसाळ्यापूर्वी आणि त्यानंतर पावसाळ्यात मागणीनुसार व वॉर्डच्या साठवणूक क्षमतेनुसार वितरण होईल.

उपयोग कितपत यशस्वी? कोल्डमिक्सचा वापर केल्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच डांबरमिश्रित खडी वाहून जाते. त्यामुळे ज्या भागांमध्ये खड्डे बुजविले जातात त्या रस्त्यांवर खडी मोठ्या प्रमाणात पसरून अनेकदा अपघाताला कारणीभूत ठरतात, अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे खड्ड्यांसाठी कोल्डमिक्स तंत्रज्ञानाऐवजी पालिका प्रशासनाकडून इतर उपाययोजना किंवा तंत्रज्ञानाचा उपयोग का होत नाही, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.