Join us

"एकेक मृत्यूची सखोल चौकशी करणार"; वैद्यकीय शिक्षणमंत्री नांदेड रुग्णालयात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2023 3:13 PM

नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गेल्या २४ तासांत २४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मुंबई/अमरावती - नांदेडच्या सरकारी रुग्णालयात २४ तांसात २४ जणांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली होती. त्यानंतर, आता छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात गेल्या २४ तासांत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय घाटी रुग्णालयाला कायम औषधटंचाईला तोंड द्यावे लागते. सोमवारीही येथे केवळ १५ दिवस पुरेल इतकाच औषधसाठा होता. शिवाय हातात औषधाच्या चिठ्ठ्या घेऊन भटकणारे नातेवाईकही येथे पाहायला मिळाले. त्यामुळे, राज्यातील शासकीय रुग्णालयेच आजारी असल्याचं दिसून येत आहे. याप्रकरणी आता राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रिफ यांनी भूमिका मांडली.  

नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गेल्या २४ तासांत २४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात गंभीर बाब म्हणजे मृतांमध्ये १२ नवजात बालकांचा समावेश होता. त्यामुळे नांदेडात एकच खळबळ उडाली आहे. अत्यवस्थ रुग्णांना वेळेत औषधे न मिळाल्याने जीव गमवावा लागण्याची वेळ येत असल्याची भीती व्यक्त होत आहे. घाटी रुग्णालयात रुग्णसंख्येच्या तुलनेत मिळणारा निधी अपुरा पडतो. औषध पुरवठाही अपुरा पडतो. त्यामुळेच घाटीत कायम औषधटंचाई पाहायला मिळते. त्यामुळे घाटी परिसरात औषध दुकानांची संख्या वाढतच आहे. या घटनेनंतर सरकारी यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. त्यामुळेच, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रिफ यांनी नांदेड भेट देण्याचं नियोजन केलंय. 

मी आयुक्तांना आणि संचालकांना कालच नांदेडला पाठवलं असून या घटनेच्या चौकशीसाठी समिती नेमण्यात येणार आहे. नांदेड रुग्णालयात झालेल्या २४ मृत्यूंची आणि आणखी ७ मृत्यूंची माहिती मिळाली आहे. म्हणजे एकूण मी ३१ मृत्यूंची नोंद झाली असून एकेक मृत्यूप्रकरणाची चौकशी केली जाईल, तसेच दोषांवर कारवाई करण्यात येईल, असे राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रिफ यांनी म्हटले. तसेच, मीही आज नांदेडला भेट देत असल्याचेही त्यांनी सांगितले. 

छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयात दररोज २००० रुग्ण येतात. तर, नांदेडमध्येही १५०० च्या आसपास संख्या असते. मी अद्याप पूर्ण माहिती घेतली नाही. माहिती घेऊन यावर बोलेन, असेही मुश्रिफ यांनी छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात झालेल्या ७ मृत्यूसंदर्भात बोलताना म्हटले. तसेच, सरकारी रुग्णालयात येणारे रुग्ण हे शेटवच्या स्टेजला असताना येतात. अपघातातील जखमी रुग्णही सरकारी रुग्णालयातच येतात. खासगी रुग्णालयात बिल जास्त येते म्हणूनही अनेक रुग्ण इकडे येतात. तर, प्रसुतीनंतर कमी वजनाचे बाळ जन्माला येते, अशा अनेक घटना आहेत, त्याची आम्ही सखोल चौकशी करू. याप्रकरणी डॉक्टरांचा हलर्गीजपणा असेल, औषधे नसतील तर आम्ही निश्चित कारवाई करू, असे आश्वासनही मुश्रिफ यांनी दिले. 

औषधांची लवकर खरेदी व्हावी, यासाठीच आम्ही नवीन प्राधिकरण तयार केलं आहे. तर, जिल्हा नियोजन मंडळाचा जो पैसा आहे, औषधांच्या खरेदीसाठीचा त्याला जिल्हाधिकारी यांनाच अधिकार आहे. काल कोल्हापूरमध्ये ५ कोटी रुपयांची औषधांची खरेदी झाली, ती जिल्हाधिकाऱ्यांनीच केली. त्यामुळे, औषधांची कमतरता असल्याचं मला वाटत नाही, पण नेमकं काय झालंय याची आम्ही सखोल चौकशी करू, असेही हसन मुश्रिफ यांनी सांगितले.  

 

टॅग्स :हॉस्पिटलनांदेडहसन मुश्रीफमृत्यू