- सीमा महांगडे मुंबई : भाजपचा भक्कम गड मानल्या जाणाऱ्या बोरीवली मतदारसंघात सध्याचे आमदार विनोद तावडे यांना आगामी विधानसभा निवडणुकीत इतर पक्षांचे उमेदवार किती तगडी लढत देतात, हे पाहणे उत्कंठापूर्ण ठरणार आहे. २०१४ सालच्या विधानसभा निवडणुकीत विनोद तावडे तर त्याआधी २००९ मध्ये सध्याचे बोरीवलीतील विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी आमदार म्हणून निवडणूक लढवून जिंकले होते. यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून गोपाळ शेट्टी यांनी नुकताच एकतर्फी विजय मिळविला आहे. या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीतही भाजपचा हा चिरेबंदी वाडा कायम राहील का, याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.बोरीवली विधानसभा मतदारसंघात मराठी भाषिक मतदारांचे प्रमाण लक्षणीय आहे. मराठी भाषिक मतदार असूनही या भागात शिवसेनेचा बोलबाला कधीही निर्माण झाला नाही. मागच्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेची युती विधानसभेपूर्वी फिस्कटली. त्यामुळे शिवसेनेने भाजपमधून आलेल्या अगरवाल यांना उमेदवारी दिली. मतदारांनी शिवसेनेच्या या आयात उमेदवारास पाठिंबा न दिल्याने त्यांना २९ हजार ०११ मतांवर समाधान मानावे लागले होते.सध्या तरी आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युती म्हणून लढत देणार असल्याने सेनेच्या उमेदवाराचा प्रश्नच नाही. लोकसभा निवडणुकीत गोपाळ शेट्टी यांच्याकडून काँग्रेसच्या ऊर्मिला मातोंडकर यांना पराभव पत्करावा लागला आहे. तर २०१४च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या अशोक सुतराळे यांना १४ हजार ९९३ मतांवर समाधान मानावे लागले होते.विद्यमान आमदार तावडे यांना मिळालेल्या मतांच्या तुलनेत मतांची ही दरी तब्बल ९३ हजार २८५ होती. त्यामुळे बोरीवली विधानसभा क्षेत्रातून यंदा बिनचेहºयाच्या काँग्रेसला मतांसाठी चेहरा मिळणार का, असा प्रश्न आहे. सन २००९ साली असणारी मनसेची लाट आता ओसरल्याचे मानले जाते. २००९च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने ६८,९२६ मते मिळवली तर दुसºया क्रमांकावरील मनसेने ३८,६९९ मते मिळवली होती. २०१४च्या निवडणुकीत मनसेकडून उभ्या राहिलेल्या नयन कदम यांना २१ हजार ७६५ मतांवर समाधान मानावे लागले होते. यंदाही नयन कदम यांच्या रूपाने मनसे फॅक्टर बोरीवली विधानसभा मतदारसंघात काही विशेष घडवेल असे चित्र सध्या तरी नाही.मतदारसंघातील स्थितीबोरीवली विधानसभा क्षेत्रात गुजराती, मराठी आणि काही प्रमाणात उत्तर आणि दक्षिण भारतीय मतदारांवर उमदेवारांची भिस्त आहे. आगामी विधानसभा निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे उच्चभ्रू, व्यावसायिक, मध्यमवर्गीय ते झोपडपट्टी असा बहुविध पट असणाºया बोरीवली मतदारसंघात सक्षम, स्थानिक नेतृत्व उभे करणे आणि ते टिकवून ठेवण्याचे आव्हान काँग्रेस कार्यकर्त्यांसमोर राहणार आहे.
भाजपच्या चिरेबंदी वाड्यात काँग्रेसला चेहरा मिळणार का?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2019 1:31 AM