नायट्रोजन युनिटचे रूपांतरण ऑक्सिजन युनिटमध्ये करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:08 AM2021-04-30T04:08:18+5:302021-04-30T04:08:18+5:30

आयआयटी मुंबईच्या चाचणीला यश; ऑक्सिजन तुटवड्याचा प्रश्न साेडविण्यासाठी प्रयत्न लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : देशातील ऑक्सिजनचा पुरवठा आणि त्याचा ...

Will convert nitrogen units into oxygen units | नायट्रोजन युनिटचे रूपांतरण ऑक्सिजन युनिटमध्ये करणार

नायट्रोजन युनिटचे रूपांतरण ऑक्सिजन युनिटमध्ये करणार

Next

आयआयटी मुंबईच्या चाचणीला यश; ऑक्सिजन तुटवड्याचा प्रश्न साेडविण्यासाठी प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : देशातील ऑक्सिजनचा पुरवठा आणि त्याचा योग्य पद्धतीने साठा करण्याच्या दृष्टीने नायट्रोजन युनिटचे रूपांतरण ऑक्सिजन युनिटसाठी करण्याच्या प्रायोगिक प्रकल्पाची यशस्वी चाचणी आयआयटी मुंबईकडून करण्यात आली आहे. प्रेशर स्विंग ऍबसॉरबशन (पीएसए) या तंत्राचा वापर करून प्रायोगिक तत्त्वावरील प्रकल्पाची चाचणी केल्याची माहिती आयआयटी मुंबईचे संचालक शुभाशिष चौधरी यांनी दिली. यामुळे कोविड १९ च्या वाढत्या संसर्गाच्या काळात अत्यावश्यक असणाऱ्या ऑक्सिजन साठ्याचा प्रश्न मोठ्या व्यापक प्रमाणावर सुटू शकणार असल्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

आयआयटी मुंबईत चाचणी करण्यात आलेल्या या पथदर्शी प्रकल्पाद्वारे ३.५ वातावरणीय प्रेशर असलेल्या आणि ९३ % ते ९७ % शुद्धता असलेल्या ऑक्सिजनची निर्मिती केली जाऊ शकेल. वायू रूपातील या ऑक्सिजनचा वापर देशभरातील आवश्यकता असलेल्या कोविड रुग्णांसाठी आणि त्यांच्या गरजांसाठी करता येईल. वातावरणातील वायूवर प्रक्रिया करणारे नायट्रोजन प्लांट्स देशभरातील विविध औद्योगिक आस्थापनांमध्ये वापरले जातात. त्यामुळे या आस्थापनांमधील प्रत्येक नायट्रोजन प्लांट्सचा वापर हा सार्वजनिक आरोग्य वाचविण्यासाठी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने ‘ऑक्सिजन जनरेटर’ म्हणून वापरला जाऊ शकतो. या नायट्रोजन प्लांट्सच्या सेटअपमधील कार्बन वेगळ्या करणाऱ्या चाळणीऐवजी झीओलाइट वापरून ही प्रक्रिया पूर्ण करता येणार असल्याचे आयआयटी मुंबईच्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट विभागाचे विभागप्रमुख प्रा. मिलिंद अत्रे यांनी सांगितले.

आयआयटी मुंबईतील रेफ्रिजरेशन अँड क्रायोजेनिक्स लॅब्रॉटरीमधील नायट्रोजन प्लांटचा वापर या प्रायोगिक प्रकल्पाच्या चाचपणीसाठी करण्यात आला. या प्रकल्पासाठी आयआयटी मुंबई, टाटा कन्सल्टिंग इंजिनीअर्स आणि स्पॅनटेक इंजिनीअर्स यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे. त्या आधारावर या प्रकल्पाच्या चाचपणीसाठी मार्गदर्शक सूचनाही अंतिम केल्याची माहिती अत्रे यांनी दिली. सद्य:स्थितीत ऑक्सिजनची देशातील गरज भागविण्यासाठी आणि या प्रकल्पाचा अधिकाधिक उपयोग करून घेण्यासाठी सेवाभावी संस्था, खासगी उद्योग यांना आयआयटी मुंबईने संपर्कासाठी आवाहन केले आहे.

* विविध संशाेधने ही काळाची गरज

औद्योगिक संस्था आणि शैक्षणिक संस्था यांच्यातील अशी भागीदारी ही देशाच्या विकास आणि संशोधनातील प्रगतीसाठी अत्यावश्यक आहे. देशाला सद्य:परिस्थितीत आवश्यक असणाऱ्या गरजा भागविणाऱ्या विविध क्षेत्रातील संशोधने ही काळाची गरज आहे आणि तंत्रज्ञानातील शिक्षणाचे फलित आहे.

- शुभाशिष चौधरी,

संचालक, आयआयटी मुंबई

............................................

Web Title: Will convert nitrogen units into oxygen units

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.