- सागर नेवरेकर मुंबई : पर्यावरण संवर्धन व संरक्षणाचा संदेश देण्यासाठी दिल्लीचे दाम्पत्य विवेक व रजनी कशनिया यांनी दुचाकीवरून देशभराचा प्रवास सुरू केला आहे. जलशक्ती अभियानाला पाठिंबा देण्यासाठी हे जोडपे सात ते आठ हजार किलोमीटरचा प्रवास करणार आहे. या दाम्पत्याने २१ डिसेंबर रोजी दिल्ली येथून दोन दुचाकीवरून प्रवासाला सुरुवात केली. जगभरात प्लास्टीकची समस्या दिवसेंदिवस भयानक रूप घेऊ लागली आहे. त्यामुळे प्लास्टीकचा वापर करू नये, यासाठी ‘नो सिंगल युज प्लास्टीक’चा संदेश ३० शहरांमध्ये फिरून दिला जाणार आहे.२६ डिसेंबर रोजी मुंबईमध्ये दाखल झालो. मुंबईमध्येही प्लास्टीक वापरू नये, यासाठी मुंबईकरांमध्ये जनजागृती केली. त्यानंतर मुंबईमधून गोव्याला रवाना झालो. गोव्यावरून दक्षिण भारतातील शहरांमध्ये फिरणार आहोत. जवळपास सात ते आठ हजार किलोमीटरचा प्रवास केला जाणार आहे. देशभरातील प्रवासादरम्यान ‘नो सिंगल युज प्लास्टीक’ आणि ‘प्लास्टीक प्रदूषण’ तसेच जलशक्ती अभियानांतर्गत ‘सेव्ह वॉटर’ हा संदेश दिला जाणार आहे. मुंबईत आल्यावर पर्यावरणप्रेमी शुभजीत मुखर्जी यांनी आम्हाला काही पोस्टर दिले. त्या पोस्टरमार्फत देशभरात पर्यावरण वाचविण्यासाठी जनजागृती केली जाणार आहे, अशी माहिती बाइक रायडर रजनी कशनिया यांनी दिली.नोएडा, मुंबई, कन्याकुमारी, विशाखापट्टणम, कोलकाता आणि दिल्ली असा देशभर प्रवास दुचाकीवरून सुरू आहे. हा प्रवास ६ जानेवारीपर्यंत संपविण्यात येणार आहे. उत्तर पूर्व भाग वगळण्यात आला आहे. नागरिकांनी सिंगल युज प्लास्टीक वापरणे थांबवावे. प्लास्टीक हे नद्या व समुद्राला प्रदूषित करते. ज्या राज्यात प्रवेश करू तेथील व्हिडीओ रूपात माहिती जमा केली जाईल. लोक प्लास्टीकचा कचरा कसे करतात. त्यातून आपण प्रदूषणाला कसे सामोरे जातो. या गोष्टी नागरिकांना समजावून सांगितल्या जातील, असे भाष्य विवेक कशनिया यांनी केले.पृथ्वी वाचविण्यासाठी काय केले पाहिजेप्लास्टीक पिशव्यांचा वापर करू नका, स्ट्रॉ टाळा, प्लास्टीकच्या बाटल्या व पॅकेजिंग टाळा, एखाद्या वस्तूचा पुन्हापुन्हा वापर करा, कचरा टाकू नका इत्यादी गोष्टी अंमलात आणून पृथ्वीला वाचवू शकतो.
‘नो सिंगल युज प्लास्टीक’चा संदेश ३० शहरांना देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2019 12:31 AM