मुंबई : मध्य रेल्वेच्या हार्बर लाइनवर असलेल्या कॉटनग्रीन रेल्वे स्थानकावर अतिरिक्त तिकीटघर सुरू करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना केली आहे. स्थानकाच्या दक्षिण दिशेला एकही तिकीटघर नसल्याने प्रवाशांना वळसा घालून जावे लागत असल्याने नागरिकांचे हाल होत असल्याचे मनसेचे म्हणणे आहे.मनसेचे विभागाध्यक्ष विजय लिपारे म्हणाले की, दक्षिण दिशेकडे एकही तिकीटघर नसून तिकीटघरासाठी गेल्या कित्येक वर्षांपासून स्थानिक नागरिक रेल्वेकडे मागणी करीत आहेत. मात्र प्रशासनाकडून या मागणीची दखल घेण्यात आलेली नाही. काहीच दिवसांपूर्वी मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्यासोबत तत्कालीन महाव्यवस्थापकांचे स्वीय सहायक विनीत कुमार आणि संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांनी रेल्वे स्थानकाची पाहणी केली होती. या वेळी स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावत अधिकाऱ्यांसमोर आपले गाऱ्हाणे मांडले होते. या वेळी अधिकाऱ्यांनी नागरिकांनी तत्काळ तिकीटघर सुरू करण्याचे आश्वासन दिले होते.आश्वासनाला काही महिने उलटल्यानंतरही कोणतीही कार्यवाही होताना दिसत नसल्याचा आरोप लिपारे यांनी केला आहे. पूर्वीच्या तुलनेत स्थानकावर प्रवाशांची संख्या वाढली आहे. गिरणी कामगारांची घरे आणि आजूबाजूला झालेल्या पुनर्विकासामुळे दक्षिणेकडील लोकसंख्येत प्रचंड वाढ झाल्याचा दावाही त्यांनी केला आहे. मात्र दक्षिणेकडे एकही तिकीटघर नसल्याने नागरिकांना तिकीट काढण्यासाठी उत्तरेकडे जावे लागते. वृद्ध आणि लहान मुलांना ही पायपीट करताना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. तरी रेल्वेमंत्र्यांनी या प्रश्नी विशेष लक्ष देऊन हजारो प्रवाशांचा हा प्रश्न मार्गी लावण्याचे आवाहन लिपारे यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
कॉटनग्रीनवासीयांची पायपीट थांबणार का?
By admin | Published: May 02, 2017 3:48 AM