Join us

स्मार्ट सिटींद्वारे विकास साधणारच - मुख्यमंत्री

By admin | Published: October 16, 2015 3:06 AM

स्मार्ट सिटी प्रकल्प उभे करताना कोणतीही कसर ठेवली जाणार नाही. मात्र स्मार्ट सिटीसारखे प्रकल्प यशस्वी व्हायचे असतील तर लोकसहभाग महत्त्वाचा आहे

मुंबई : स्मार्ट सिटी प्रकल्प उभे करताना कोणतीही कसर ठेवली जाणार नाही. मात्र स्मार्ट सिटीसारखे प्रकल्प यशस्वी व्हायचे असतील तर लोकसहभाग महत्त्वाचा आहे. त्यामुळे लोकांनी सहकार्य केले तर स्मार्ट सिटीसारखे प्रकल्प लोकसहभागानेच पारदर्शक होतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.नमो देव प्रतिष्ठानतर्फे आयोजित एका विशेष कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी दादर येथील वसंत स्मृती कार्यालयातून कल्याण-डोंबिवलीतील प्रगती महाविद्यालयातील तब्बल १८०० विद्यार्थ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला; त्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमात सहभागी झालेल्या दहा प्रतिभावंत विद्यार्थ्यांसह त्यांच्या कुटुंबीयांना वर्षा निवासस्थानी आमंत्रित करून स्मार्ट सिटी या विषयावर व्यक्तिगत चर्चा करण्यात येईल, असेही फडणवीस यांनी या वेळी नमूद केले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना फडणवीस म्हणाले, मूलभूत नागरी सुविधांचा उच्चस्तरीय विकास करण्यात येईल. शिवाय रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यास सरकार कटिबद्ध आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पाबाबत अधिक विशद करताना ते म्हणाले, स्मार्ट सिटीच्या विकासांतर्गत सेवा प्रदान करणाऱ्या नगरपालिकेसारख्या संस्थांमधील भ्रष्टाचाराला आळा घालण्याचे काम केले जाईल. शिवाय अधिक रोजगार उपलब्ध करून देण्यावर भर असणार आहे; कारण जेणेकरून स्थानिक लोकांनाच यात अधिकाधिक नोकऱ्या उपलब्ध होतील. गुणवत्तापूर्ण सेवा प्रदान करण्यावर आमचा अधिकाधिक भर असणार आहे. विकासाची प्रक्रिया अधिक जलद करण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल. (प्रतिनिधी)