Devendra Fadnavis ( Marathi News ) : राज्यात विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक होत असून १२ उमेदवार मैदानात असल्याने महाविकास आघाडी आणि महायुतीत चुरस निर्माण झाली आहे. एक अतिरिक्त अर्ज आल्याने नक्की कोणत्या उमेदवाराला पराभव स्वीकारावा लागणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. आपले सर्व उमेदवार जिंकावेत, यासाठी महायुतीसह महाविकास आघाडीनेही कंबर कसली असून त्यादृष्टीने रणनीती आखली जात आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील काही मतं फुटू शकतात, असा अंदाज वर्तवला जात असताना महायुतीचे सर्व उमेदवार विजयी व्हावेत, यासाठी भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सक्रिय झाल्याची माहिती समोर आली आहे.
विधानपरिषद निवडणुकीची मतदान प्रक्रिया काहीशी क्लिष्ट समजली जाते. पहिल्या पसंतीची मते, दुसऱ्या पसंतीची मते कोणाला द्यायची यावरून आमदारांमध्ये संभ्रम असतो. परिणामी अनेकदा संख्याबळ असतानाही उमेदवारांना पराभवाचं तोंड पाहावं लागतं. ही परिस्थिती उद्भवू नये, यासाठी देवेंद्र फडणवीस हे महायुतीच्या सर्व आमदारांना मतदान प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करणार असल्याचे समजते.
देवेंद्र फडणवीस यांनी २०२२ मध्ये झालेल्या विधानपरिषद आणि राज्यसभा निवडणुकीत संख्याबळ नसतानाही भाजपचे अतिरिक्त उमेदवार निवडून आणण्याची किमया साधली होती. या पार्श्वभूमीवर आता होत असलेल्या विधानपरिषद निवडणुकीतही ते महायुतीसाठी गेमचेंजर ठरणार का, हे पाहावं लागेल.
महायुतीसाठी विधानपरिषद निवडणूक का आहे आव्हानात्मक?
महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना मते फुटण्याची भीती आहे. मिलिंद नार्वेकर यांचे शिवसेनेच्या आमदारांशीच नाहीत तर एकनाथ शिंदे यांच्यासोबतही चांगले संबंध आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादीचे १७ ते १८ आमदार फुटण्याच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. हे आमदार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आश्रयाला जाण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं बोललं जात आहे. यामुळे भाजपचा स्वत:च्या आमदारांवर जरी विश्वास असला तरी शिंदे आणि पवार गटाच्या आमदारांनी दगाफटका केला तर त्याचा फटका महायुतीच्या उमेदवाराला बसणार आहे.
महायुतीकडे किती संख्याबळ?
विधानसभेत सध्या भाजपचे १०३, शिंदेसेनेचे ३९, अजित पवार गटाचे ४० आमदार आहेत. याशिवाय या तिन्ही पक्षांना काही अपक्ष व छोट्या पक्षांचा पाठिंबा आहे. महायुतीकडून भाजपच्या पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, डॉ. परिणय फुके, अमित गोरखे, सदाभाऊ खोत या पाच जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यासाठी त्यांना ११५ आमदारांचे पाठबळ लागणार आहे. म्हणजेच १२ मते बाहेरून मिळवावी लागतील. अपक्ष व लहान पक्षांचे ९ आमदार भाजपसोबत आहेत.