'ज्यांनी महाराष्ट्राची बदनामी केली, त्या पांडेंच्या प्रचाराला देवेंद्र फडणवीस जाणार का?'
By महेश गलांडे | Published: October 6, 2020 12:57 PM2020-10-06T12:57:11+5:302020-10-06T12:58:10+5:30
अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणावरुन बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी महाराष्ट्र पोलिसांच्या कामगिरीवरुन सरकारवर टीका केली होती.
मुंबई - बिहारच्या आगामी विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर त्या राज्याचे भाजपचे प्रभारी व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुढील रणनीती ठरविण्यासाठी दिल्लीला गेले आहेत. तसेच, बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपाला आणि भाजपप्रणित आघाडीला मोठ्या प्रमाणात यश मिळविण्यासाठी फडणवीस प्रचाराच्या मैदानात उतरणार आहेत. फडणवीसांच्या या भूमिकेवरुन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देवेंद्रांना प्रश्न विचारला आहे. तुम्ही, गुप्तेश्वर पांडेंचा प्रचार करणार का? असा प्रश्न विचारला आहे.
अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरुन बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी महाराष्ट्र पोलिसांच्या कामगिरीवरुन सरकारवर टीका केली होती. तसेच, मुंबई पोलीस दबावात काम करत असल्याचाही आरोप पांडे यांनी केला होता. याच पांडेंनी, अभिनेत्री रिया चक्रवर्तींचा एकेरी उल्लेख करत तिच्याबद्दल पदाला न शोभणारे वक्तव्य केले होते. त्यावरुन, सोशल मीडियात गुप्तेश्वर पांडे हे अधिकाऱ्याऐवजी नेत्यांची भाषा बोलत असल्याची टीका त्यांच्यावर करण्यात आली होती. मात्र, आता बिहार विधानसभा निवडणुकांच्या मैदानात नितीश कुमार यांच्या जदयु पक्षाकडून ते निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे, भापपप्रणित आघाडीचे ते उमेदवार असणार आहेत.
गुप्तेश्वर पांडे यांना उमेदवारी दिल्यानंतर भाजपाचे प्रभारी आणि महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद फडणवीस हे गुप्तेश्वर पांडे यांचा प्रचार करणार का, असा प्रश्न गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विचारला आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्या गुप्तेश्वर पांडेंचा प्रचार देवेंद्र फडणवीस करणार का? असा खोचक सवाल देशमुख यांनी विचारला आहे. त्यामुळे, आता देवेंद्र फडणवीस याबद्दल आपली भूमिका कशारितीने मांडतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गुप्तेश्वर पांडेंवर सामनातून टीका
सुशांतप्रकरणात मुंबई पोलिसांनी जो तपास केला ते सत्य सीबीआय आणि 'एम्स'च्या डॉक्टरांनाही बदलता आले नाही. हा मुंबई पोलिसांचा विजय आहे. अनेक गुप्तेश्वर आले गेले, पण मुंबई पोलिसांच्या प्रतिष्ठेचा झेंडा कायम फडकत राहिला. रिया चक्रवर्तीने सुशांतला विष देऊन मारले हा 'बनाव'सुद्धा चालला नाही, पण सुशांत 'ड्रग्ज' घेत होता व त्याला ते मिळवून दिले म्हणून अखेर त्या रिया चक्रवर्तीला तुरुंगात टाकले. सुशांतवर मृत्यूनंतर हाच खटला चालवण्याची कायदेशीर व्यवस्था असती तर 'ड्रग्ज' प्रकरणात सुशांतवर अमली पदार्थ सेवनाचा खटला चालला असता. मागच्या शंभर दिवसांत महाराष्ट्राची, मुंबई पोलिसांची यथेच्छ बदनामी केली, अशा गुप्तेश्वरी नट्या आणि 'गुप्तेश्वर' आता कोणते प्रायश्चित्त घेणार आहेत? जे महाराष्ट्राच्या, मराठी माणसाच्या वाटेला गेले, त्यांचे साफ वाटोळे होते. बेइमान, हरामखोरांनी हे आता तरी समजून घ्यावे. हाथरस बलात्कार प्रकरणात शेपूट घालून बसणाऱ्यांनी महाराष्ट्राच्या मर्दानगीची परीक्षा घेऊ नये!
जेदयु 122 तर भाजपा 121 जागा लढवणार
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी (Bihar Assembly Election) भाजपा आणि जनता दल यूनायटेड (JDU) यांची युती निश्चित झाली आहे. जेडीयू 122 तर भाजपा 121 जागांवर ही निवडणूक लढेल. जेडीयू आपल्या जागांतील काही जागा जीतनराम मांझी यांना देणार आहे. तर भाजपा आपल्या जागांतील काही जागा व्हीआयपी पार्टीला देईल. उद्या पाटणा येथे युती, जागा आणि उमेदवारांची घोषणा होईल. मांझी यांना पाच ते सात जागा मिळण्याची शक्यता आहे.