श्रीकांत जाधव
मुंबई : जाहीर सभेत या बकाल झोपडपट्टीचे नंदनवन करू, असा शब्द दिला होता. त्यातून एसआरए योजनेचा जन्म झाला. मात्र, धारावीला आजपर्यंत एसआरएपासून वंचित ठेवले गेले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, पण त्यांनीही धारावीकरांना ५०० स्क्वे. फुटांचे घर दिले नाही. आता ४०० स्क्वे. फुटांचे घर अदानी बांधून देत आहे. त्याला विरोध करून राजकारण केले जात आहे. तेव्हा मातोश्री तीन बांधल्यानंतरच धारावीचा विकास करणार का ? असा संतप्त सवाल धारावी पुनर्विकास समितीचे सदस्य भास्कर शेट्टी यांनी धारावी बचावचा नारा देण्याऱ्या उद्धव ठाकरे यांना केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार धारावीकरांना ४०० स्क्वे. फुटांचे घर देत आहे. तेव्हा उद्धव ठाकरे गटाचे लोक ५०० स्क्वे. फुटांची मागणी करून धारावी पुनर्विकासाला विरोध करीत आहेत. त्याचा धारावीपेक्षा अदानीच्या टीडीआरवर डोळा आहे. तेव्हा उद्धव यांनी मातोश्री १ नंतर मोतोश्री २ बांधली. आता अदानीला विरोध हा मातोश्री तीन बांधण्यासाठी आहे का ?, असा सवाल शेट्टी यांनी केला यावेळी केला.
शुक्रवारी प्रेस क्लब येथे धारावी पुनर्विकास समितीच्या सदस्यांनी आपली भूमिका स्पष्ट करीत माध्यमांशी संवाद साधला. धारावीत फक्त मतांचे राजकारण केले, पण विकास केला नाही. धारावीकरांना पक्ष आणि राजकारणाशी काहीही घेणेदेणे नाही. नागरिकांचा विकास व्हावा हीच आमची मागणी असल्याचे समितीचे अध्यक्ष रमाकांत गुप्ता, वकील शेख, प्रवीण जैन यांनी सांगतिले. तर धारावीत उद्योगांचा आणि दुकानदारांचा नवीन सर्व्हे करून त्यांचे धारावीमध्येच पुनर्वसन केले जाईल. त्यामध्ये फक्त ५७,००० घरेच पात्र केली जातील, बाकी सर्वाना अपात्र केले जाईल, अशी अफवा पसरवली जात असल्याचे भास्कर शेट्टी म्हणाले.
मोकाच्या जागी संस्था बांधून कमाई - रायबागे
इतकी सरकारे येऊन गेली, पण धारावीचा विकास कुणीही केला नाही. याआधी ४०० स्क्वे. फुट घराची मागणी होती. पण धारावीतील काँग्रेस आमदार व खासदारांनी २२५ स्क्वे. फुटांच्या वर घर देता येणार नाही, असे निक्षून सांगितले, असा आरोपही धारावी पुनर्विकास समितीचे कोषाध्यक्ष, चर्मकार समाजाचे नेते मनोहर रायबागे यांनी काँग्रेस आमदार वर्षा गायकवाड यांच्यावर केला. महापुरुषांच्या नावाने मोकाच्या जागी संस्था बांधून त्याची कमाई खात आहेत असेही ते म्हणाले.