लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : केंद्रीय गृह मंत्रालयाची नक्षलग्रस्त राज्यांतील मुख्यमंत्र्यांशी २६ सप्टेंबरला दिल्लीत बैठक होणार आहे. त्यामध्ये राज्यातील नक्षलवादी भागातील विकासकामांची सद्यस्थिती व रखडलेल्या बाबींबाबत चर्चा केली जाणार आहे, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली.
दिल्लीतील बैठकीबाबत आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृह विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. त्याबाबत वळसे-पाटील म्हणाले, ‘नक्षलवादी कारवायांमुळे ज्या राज्यांना त्रास सहन करावा लागत आहे, त्याबाबत उपाययोजना करण्याच्या दृष्टीने दिल्लीच्या बैठकीत चर्चा होणार आहे. त्यामध्ये राज्याच्या प्रश्नांवर चर्चा करुन त्यावर मार्ग काढायचा प्रयत्न केला जाईल. त्याची तयारी म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी राज्यातील नक्षलवादविषयक आढावा बैठक घेतली होती.’ त्यानंतर गुरुवारी पुन्हा मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि अन्य अधिकाऱ्यांशी चर्चा केली.