मुंबईत पुन्हा २६/११ करू; पाकिस्तानी मोबाइलवरून पाठवला धमकीचा मेसेज

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2022 06:04 AM2022-08-21T06:04:40+5:302022-08-21T06:05:11+5:30

‘मुबारक हो... मुंबई में हमला होनेवाला है, जो आपको २६/११ की तारीख याद दिलाएगा. मैं पाकिस्तान से हूँ और आपके कुछ इंडियन्स मुझे साथ दे रहें है...’

Will do 26 11 again in Mumbai Threatening message sent from Pakistani mobile | मुंबईत पुन्हा २६/११ करू; पाकिस्तानी मोबाइलवरून पाठवला धमकीचा मेसेज

मुंबईत पुन्हा २६/११ करू; पाकिस्तानी मोबाइलवरून पाठवला धमकीचा मेसेज

googlenewsNext

मुंबई :

‘मुबारक हो... मुंबई में हमला होनेवाला है, जो आपको २६/११ की तारीख याद दिलाएगा. मैं पाकिस्तान से हूँ और आपके कुछ इंडियन्स मुझे साथ दे रहें है...’ असा संदेश शुक्रवारी रात्री उशिरा मुंबई वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर झळकला. या धमकी संदेशामुळे खळबळ उडाली असून, पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. शहर व उपनगरांतील सर्व पोलीस ठाण्यांना दक्ष राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गुन्हे शाखेची तीन पथके याप्रकरणी तपास करत आहेत.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहतूक पोलिसांच्या वरळी येथील नियंत्रण कक्षाच्या व्हॉट्सॲप क्रमांकावरील धमकी संदेश शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास आला. नियंत्रण कक्षाचा व्हॉट्सॲप क्रमांक नागरिकांना तक्रारी दाखल करता याव्यात यासाठी असल्याने तो सर्वांसाठी खुला आहे. त्याचाच वापर धमकी संदेशासाठी करण्यात आला आहे. धमकीच्या संदेशाची गांभीर्याने दखल घेत तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. 

धमकी संदेशात नेमके काय?
- मुंबईमध्ये हल्ला करण्याची आम्ही जोरदार तयारी करत आहोत. मी पाकिस्तानातील असून, काही भारतीय मुंबई उडविण्यासाठी माझी साथ देत आहेत. मुंबईला उडवण्याची पूर्ण तयारी झाली आहे, आता काहीच वेळ शिल्लक आहे. कधीही हल्ला करू शकतो. 
- २६/११चा हल्ला लक्षात असेलच. नसेल तर आता पुन्हा एकदा पाहा. ही फक्त धमकी नाही, तर आम्ही प्रत्यक्षात येतोय. माझे लोकेशन पाकिस्तानमध्ये दिसेल, पण काम मुंबईत चालेल. आमचा काही ठिकाणा नसतो. लोकेशन तुम्हाला दुसऱ्याच देशाचे दिसेल या माहितीसह दहशतवादी अजमल कसाबच्या नावाचा उल्लेख यात करण्यात आला आहे. 
- तसेच काही क्रमांकांची एक यादीही पाठविली असून, ते क्रमांक भारतातील असल्याची माहिती समोर येत आहे. सिद्धू मुसेवाला तसेच उदयपूरमधील टेलरची हत्या यांसारख्या घटनांचाही या धमकी संदेशात समावेश आहे. 

शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला हा धमकी संदेश आला. प्राथमिक तपासात संदेशातील क्रमांक पाकिस्तानातील असल्याचे दिसत आहे. मुंबई पोलीस सर्व बाजूने तपास करत आहेत. सण, उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून योग्य ती खबरदारी घेण्यात आली असून, कोणीही घाबरू नये. मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलीस कटिबद्ध आहेत. रायगड बोट प्रकरणानंतर मुंबईतील समुद्रकिनारीही सुरक्षा वाढविण्यात आली आहे.     
- विवेक फणसळकर, पोलीस आयुक्त. 

‘तो’ नंबर लाहोरमधील व्यक्तीचा 
धमकीसाठी वापरण्यात आलेला मोबाइल नंबर लाहोरमधील मोहम्मद इम्तियाज नावाच्या व्यक्तीचा आहे. मात्र, आपण कोणतीही धमकी दिलेली नाही, असे त्याचे म्हणणे आहे. आपल्या नंबरवरून दुसरा कोणीतरी व्हॉट्सॲप वापरत आहे, असा दावा त्याने पाकिस्तानी माध्यमांशी बोलताना केला आहे.

साेमालियामध्ये मुंबईप्रमाणे दहशतवादी हल्ला; १२ ठार
माेगादिशू : साेमालियाची राजधानी माेगादिशू येथे माेठा दहशतवादी हल्ला झाला. दहशतवाद्यांनी हाॅटेलमध्ये शिरून गाेळीबार केला. त्यात १२ जणांचा मृत्यू झाला असून ९ जण गंभीर जखमी झाले आहेत. मुंबईवर झालेल्या २६/११च्या हल्ल्याप्रमाणेच हा हल्ला हाेता. दहशतवाद्यांनी हाॅटेलमध्ये कर्मचारी व इतर नागरिकांना बंधक बनविले आहे. 

सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू असून त्यात वरिष्ठ गुप्तचर अधिकारी जखमी झाले आहेत. दहशतवादी हयात या हाॅटेलमध्ये शिरले. त्यापूर्वी त्यांनी हाॅटेलच्या बाहेरील २ कारमध्ये बाॅम्बस्फाेट केला. हाॅटेलमध्ये शिरताच त्यांनी बेछूट गाेळीबार केला. त्यात १३ जणांचा मृत्यू झाला. अनेक परदेशी पर्यटक जखमी झाल्याची माहिती आहे. 

Web Title: Will do 26 11 again in Mumbai Threatening message sent from Pakistani mobile

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.