लाेकमत न्यूज नेटवर्क
जव्हार : मला पालघरचा सर्वांगीण विकास करायचा आहे. केवळ जिल्हा घाेषित करून, जिल्हा कार्यालय स्थापले आणि रुग्णालय उभारले म्हणजे पुरेसे नाही. तर येथील समस्या मुळापासून संपवायला हव्यात. आदिवासींची संस्कृती जपूनच हा विकास करावा लागेल. जव्हार हे चांगले हिल स्टेशन म्हणून विकसित झाले पाहिजे. जिल्ह्यात पर्यटनातून राेजगारनिर्मितीवर भर दिला जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
ते शुक्रवारी जव्हारच्या दौऱ्यावर आले होते. त्या वेळी ते बाेलत हाेते. ठाकरे यांनी सकाळी जव्हार प्रांत कार्यालयात आढावा बैठक घेतली. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, धरणांची उंची वाढवणे, प्रकल्पांची दुरुस्ती यावर चर्चा झाली आहे. तसेच ढापरपाडा, कुटीर रुग्णालय जव्हार, जामसर प्राथमिक आरोग्य केंद्र, खरवंद येथील घरकुलाची पाहणी केली व रुग्णांची विचारपूस केली. या वेळी त्यांच्यासमवेत पालकमंत्री दादा भुसे, आमदार सुनील भुसारा, आमदार रवींद्र फाटक, श्रीनिवास वणगा आदी उपस्थित होते.
यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी जव्हार येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. मुख्यमंत्री म्हणाले, पालघर जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था अधिक मजबूत केली जाईल. पालघरचा विकास करताना उद्योग-पर्यटन यांचा एकत्रित विचार केला जाईल. तसेच जिल्हा प्रशासनाची नवी इमारत व परिसराचा लवकर विकास करण्यात येईल. दरम्यान, कुपोषण, पाणीटंचाई, बेरोजगारीवर बाेलणे मुख्यमंत्र्यांनी टाळल्यामुळे ‘ते आले, त्यांनी पाहिले अन् पदरात काहीच न टाकता निघून गेले’ अशी या दाैऱ्याची स्थिती हाेती.
जव्हारलाही धावपट्या बनवू
राज्यपालांना विमान नाकारल्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी उपराेधिक उत्तर दिले. जव्हारलाही विमानाच्या धावपट्ट्या बनवू. म्हणजे सर्वांची विमाने येथे उतरतील आणि सर्वांनाच विमानात बसायला मिळेल, असे सांगताच पत्रकार परिषदेत हास्य उमटले. मात्र, या विधानानंतर जव्हार-डहाणू रेल्वे मार्गाची जुनी मागणी मागे पडून विमानतळ आधी हाेणार की काय, अशी चर्चा जव्हारमध्ये रंगली हाेती.
पत्रकारांना अडवले
मुख्यमंत्र्यांच्या या दाैऱ्यात वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना पासच देण्यात आले नव्हते. त्यामुळे गाेंधळाचे वातावरण हाेते. तसेच वेगवेगळ्या ठिकाणच्या पाहणीवेळी पत्रकारांना पाेलीस बंदाेबस्ताच्या नावाखाली अडवण्यात आले. या दाैऱ्यात पदाधिकारी, कार्यकर्त्यांचीही हेळसांड करण्यात आल्याचे दिसून आले.
फोटो -
1) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खरवंद येथील प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुलाची पाहणी केली.
2) कुटीर रुग्णालयाची पाहणी करताना मुख्यमंत्री. साेबत खासदार राजेंद्र गावित, आमदार सुनील भुसारा, आमदार रवींद्र फाटक.
3 ) प्राथमिक आरोग्य केंद्र जामसर येथे पाहणी करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.