महाराष्ट्रासाठी स्वतंत्र भूस्खलन देखरेख व अभ्यास संस्था स्थापन करणार; फडणवीसांची ग्वाही

By मनोहर कुंभेजकर | Published: September 9, 2023 04:38 PM2023-09-09T16:38:50+5:302023-09-09T16:39:47+5:30

आमदार ॲड आशिष शेलार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधले होते.

will establish an independent landslide monitoring and study institute for maharashtra said devendra fadnavis | महाराष्ट्रासाठी स्वतंत्र भूस्खलन देखरेख व अभ्यास संस्था स्थापन करणार; फडणवीसांची ग्वाही

महाराष्ट्रासाठी स्वतंत्र भूस्खलन देखरेख व अभ्यास संस्था स्थापन करणार; फडणवीसांची ग्वाही

googlenewsNext

मनोहर कुंभेजकर, मुंबई-केंद्राच्या धर्तीवर महाराष्ट्रासाठी देशातील पहिली राज्यस्तरीय “भूस्खलन देखरेख आणि अभ्यास संस्था” स्थापन करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड आशिष शेलार यांच्या मागणीवर दिली.

महाराष्ट्रात पावसाळयात भूस्खलनाच्या घटना दरवर्षी घडत असून माळीन, तळीये नंतर या पावसाळयात खालापूर येथील ईसाळवाडी येथे भूस्खलन होऊन शेकडो जणांचे बळी गेले. सह्याद्रीच्या भूगर्भात होत असलेल्या बदलांचा साकल्याने अभ्यास करण्याची गरज असून त्यासाठी भूस्खलन देखरेख आणि अभ्यास करणारी राज्याची स्वतंत्र संस्था असावी, अशी मागणी अभ्यासाअंती “ब्रम्हा रिसर्च फांऊडेशनने” केली होती त्याला पाठींबा देत याकडे  आमदार ॲड आशिष शेलार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधले होते.

भूस्खलनाच्या वाढत्या घटनांकडे लक्ष देण्यासाठी आणि जीवित व मालमत्तेची होणारी हानी रोखण्यासाठी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी आमदार अॅड आशिष शेलार यांची मागणी मान्य केली आणि आपत्ती व्यवस्थापन सचिवांना तातडीने समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील पश्चिम घाट/सह्याद्री प्रदेशांसह शहरी आणि ग्रामीण डोंगराळ प्रदेशातील भूस्खलनाचा अभ्यास आणि निरीक्षण करण्यासाठी भारतातील पहिली राज्यस्तरीय विशेष संस्था महाराष्ट्रात स्थापन होणार आहे.

‍विविध विषयावर संशोधन व अभ्यास करणाऱ्या ब्रम्हा रिसर्च फाऊंडेशनचे संचालक आणि निवृत्त आयएएस अधिकारी डॉ. विजय पागे यांनी अभ्यासाअंती भारत सरकारच्या संरक्षण जिओ इन्फॉरमॅटिक्स रिसर्च एस्टॅब्लिशमेंट (DGRE) च्या धर्तीवर "सह्याद्री इन्स्टिट्यूट जिओ इन्फॉरमॅटिक्स रिसर्च अँड मॉनिटरिंग" अशी संस्था महाराष्ट्रात स्थापन करणे आवश्यक असल्याची कल्पना मांडली. या संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील भूस्खलन प्रवण प्रदेश आणि त्याला सामोरे जाण्यासाठी धोरणे व उपाय योजना विकसित करण्याचे काम या संस्थेने करावी अशी ही कल्पना आहे.

या विषयावर बोलताना डॉ.विजय पागे म्हणाले की, "वाढत्या अतिवृष्टीच्या घटना, तसेच जंगलातील घट, भूस्खलन प्रवण भागात वाढत्या मानवी वसाहतींमुळे महाराष्ट्रातील पश्चिम घाट, सह्याद्री प्रदेशात लाखो लोकांचे जीवन आणि संपत्ती धोक्यात आली आहे. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणाच्या 2020 च्या अभ्यासानुसार महाराष्ट्रातील 225 गावे भूस्खलन प्रवण म्हणून वर्गीकृत आहेत. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात अशी ७४ क्षेत्रे भूस्खलन प्रवण क्षेत्र म्हणून ओळखली गेली आहेत. त्यामुळे बदलत्या  नैसर्गिक परिस्थितीचे आकलन करुन भविष्यात उद्भवणाऱ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी शास्त्रशुध्द पध्दतीची धोरणे व उपाययोजना तयार करण्याची गरज आहे. आम्ही  हा विषय आमच्या संस्थेचे हितचिंतक आमदार ॲड आशिष शेलार यांच्यापुढे मांडला त्यांनी त्याची तातडीने दखल घेऊन त्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पत्राव्दारे लक्ष वेधले व त्यांनीही तातडीने या विषयाची दखल घेतली त्याबद्दल त्यांनी या  दोघांचेही आभार मानले. ही संस्था लवकरच स्थापन होऊन लाखो रहिवांशांचे प्राण वाचविण्यासाठी नक्कीच आवश्यकत्या उपाययोजना व पुढाकार घेईल, असा आशावादही डॉ. पागे यांनी व्यक्त केला.

Web Title: will establish an independent landslide monitoring and study institute for maharashtra said devendra fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.