Join us

ईडीला निर्धाराने सामोरे जाणार-अमोल कीर्तिकर

By मनोहर कुंभेजकर | Updated: April 7, 2024 20:09 IST

ईडी मार्फत येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांना तोंड देण्याचे ठरवले असल्याचे कीर्तिकर म्हणाले.

मुंबई- पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपनेते अमोल कीर्तिकर यांना शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातून उमेदवारी जाहिर केल्यापासून ते भेटी गाठी द्वारे ते मतदारांच्या समस्या जाणून घेत त्यांची भूमिका देखिल मांडतात.

आपल्यावर कोणताही एफआयआर दाखल झाला नसतांना देखिल इडीच्या धमक्या आल्याचे ते स्वतः मतदारांशी बोलताना सांगतात. त्यांनी तर आपल्या पत्नी सुप्रिया व  आपल्याला अटक झाली तर पुढे काय करायचे हे देखील सांगून ठेवले आहे व आपले स्वत:चे आणि कुटुंबाचे मन देखिल बनवले आहे. काही झाले तरी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे व आमदार,माजी मंत्री आदित्य ठाकरे यांची साथ काही केल्या सोडणार नाही असे  कीर्तिकर येथील नागरिकांना आश्वासित करतात. 

त्यांनी पूर्व तयारी म्हणून शाकाहारी आहार पध्दत अंगिकारली आहे असे समजते. तसेच ते जमिनीवर देखील झोपायची सवय केली असल्याचे कळते.अश्या प्रकारे त्यांनी इडी मार्फत येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांना तोंड देण्याचे ठरवले आहे.

त्यांनी नुकतीच मातोश्री वर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. जर  "आपला अमोल" तुरूंगात गेला तर प्रत्येक शिवसैनिक हा अमोल कीर्तिकर बनून प्रचारात पेटून उतरेल आणि हि जागा जिंकून आणेल असे ठाम निर्धार ठाकरे यांनी यावेळी त्याला दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान येथील अंधेरी पश्चिम,वर्सोवा,अंधेरी पूर्व,जोगेश्वरी पूर्व,गोरेगाव,दिंडोशी या सहा विधानसभा मतदार संघात त्यांनी शाखा शाखांच्या आणि विधानसभा निहाय बैठका पूर्ण झाल्या आहेत.शिवसैनिक आणि पदाधिकारी जोमाने कामाला लागले आहे.शिवसेना नेते आणि माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई,शिवसेना नेते,आमदार अँड.अनिल परब,शिवसेना नेते,आमदार सुनील प्रभू,या मतदार संघाचे निरीक्षक व आमदार विलास पोतनीस यांचे मोलाचे मार्गदर्शन त्यांना मिळत आहे. 

टॅग्स :मुंबई