भाजपाला आठवली शिवसेना; लोकसभा निवडणूक एकत्र लढवण्यावर अमित शाह ठाम
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2018 01:08 PM2018-05-08T13:08:10+5:302018-05-08T13:08:10+5:30
उद्धव ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेनंतर शिवसेनेला गोंजारण्याचे भाजपाचे प्रयत्न
बंगळुरू: शिवसेना आणि भाजपमधलं विळ्या भोपळ्याचं नातं सर्वश्रुत आहे. भाजपाकडून वारंवार डावललं जात असल्यानं शिवसेनेनं 'एकला चलो रे'ची भूमिका घेतलीय. त्यामुळे नाराज झालेल्या शिवसेनेला गोंजारण्याचं काम भाजपानं सुरू केलंय. शिवसेना आणि भाजपा एकत्रित लोकसभा निवडणूक लढवतील, असं भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी एका मुलाखतीत म्हटलंय. टीडीपी स्वत:हून एनडीएबाहेर पडला. मात्र शिवसेना आमच्यासोबत कायम राहिल. आम्ही पुढील निवडणूक एकत्र लढवू, असा विश्वास विश्वास शाह यांनी व्यक्त केला.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांनी एका हिंदी वृत्तपत्राला मुलाखत दिली. यावेळी त्यांना नाराज घटक पक्षांविषयी विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी शिवसेना एनडीएमध्ये कायम राहिल, असं शाह यांनी म्हटलं. 'टीडीपी स्वत:हून एनडीएबाहेर पडला. ओदिशात भाजपा आणि बीजेडीमध्ये थेट लढत होईल. कोलकात्यात तृणमूल काँग्रेसकडून भाजपावर हल्ले केले जात आहेत. स्वत:च अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांची धडपड सुरूय,' असं शाह यांनी म्हटलं.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळेल, असा विश्वास शाह यांनी व्यक्त केला. 'कर्नाटक निवडणुकीतील विजयानं भाजपासाठी दक्षिणेचं द्वार उघडेल. त्यामुळे ही निवडणूक भाजपासाठी महत्त्वाची आहे,' असं शाह यांनी म्हटलं. यावेळी त्यांनी कर्नाटकमधील काँग्रेस सरकारवर तोंडसुख घेतलं. 'काँग्रेसनं गेल्या पाच वर्षांमध्ये कोणतीही कामं केलेली नाहीत. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये 173 टक्क्यांनी वाढ झालीय. भाजपचं सरकार आल्यास 10 दिवसांमध्ये शेतकऱ्यांचं 1 लाखंपर्यंतचं कर्ज माफ करण्यात येईल,' असंही शाह म्हणाले.