‘त्या’ पोलीस अधिकाऱ्याविरोधात तक्रार करणार : अतुल भातखळकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:08 AM2021-01-16T04:08:17+5:302021-01-16T04:08:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराच्या आरोपांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेली क्लीनचिट म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराच्या आरोपांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेली क्लीनचिट म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील बेशरमपणाचा परमोच्च बिंदू आहे, असा आरोप भाजपचे मुंबई प्रभारी आमदार अतुल भातखळकर यांनी केला. राज्यातील जनता हा सारा प्रकार शांतपपणे पाहत बसेल अशा गैरसमजात राहू नये, असेही ते म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी पोलिसांकडून माहिती घेतली. मुंबईचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी सिल्व्हर ओक येथे शरद पवार यांची भेट घेतल्याचा वृत्ताचा हवाला देत भातखळकर यांनी त्यांच्यावरही टीका केली. पोलीस अधिकाऱ्यांनी शरद पवारांसोबत चर्चा करायला ते राज्याचे गृहमंत्री आहेत की मुख्यमंत्री? राज्यात कोणतेही अधिकार पद नसलेल्या पवारांशी चर्चा करणाऱ्या या पोलीस अधिकाऱ्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी मी कॅबिनेट सचिवांकडे करणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच या प्रकरणात शरद पवार यांनी पडद्याआडून सूत्रे हलविण्यापेक्षा घरी बसलेल्या मुख्यमंत्र्यांना नारळ देऊन प्रत्यक्ष सत्ताच हातात घ्यावी, अशी खोचक टिप्पणी त्यांनी केली.
......................