'अंतिम वर्षाची परीक्षा MCQ ने होणार? विद्यार्थ्यांना प्रश्चसंच पुरविण्याची मागणी'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2020 06:24 PM2020-09-07T18:24:04+5:302020-09-07T18:25:48+5:30
अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीनेच होणार असून यासाठी संबंधित महाविद्यालयांकडून प्रकाशित होणारा गुगल फॉर्म विद्यार्थ्यांनी १५ सप्टेंबर २०२० पूर्वी भरून देणे अपेक्षित आहे.
मुंबई - विद्यापीठ अनुदान आयोग, महामहिम राज्यपाल आणि राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार अंतिम वषार्तील विद्यार्थ्याच्या परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे. यानुसार ऑक्टोबर महिन्यात या परीक्षा होतील, सर्व विद्यार्थ्यांनी अभ्यासाला लागून परीक्षेची तयारी करावी. परीक्षेचे स्वरूप हे घरी राहूनच ऑनलाईन पद्धतीने राहणार आहे. तर, या परीक्षा एमसीक्यू म्हणजे मल्टीपल चॉईस क्वेशन पद्धतीने घेतल्या जाणार असल्याचे समजते, असे युवा सेनेचे सविच वरुण सरदेसाई यांनी म्हटले आहे.
अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीनेच होणार असून यासाठी संबंधित महाविद्यालयांकडून प्रकाशित होणारा गुगल फॉर्म विद्यार्थ्यांनी १५ सप्टेंबर २०२० पूर्वी भरून देणे अपेक्षित आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षा देता येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाइनची सुविधा उपलब्ध होणार नाही, अशा विद्यार्थ्यांना अपवादात्मक परिस्थितीमध्येच ऑफलाईन परिक्षा देण्याची सुविधा राहणार आहे, परंतु त्याचे कारण विद्यार्थ्यांना गुगल फॉर्ममध्ये द्यावे लागणार आहे. अंतिम वषार्तील सर्व विद्यार्थ्यांना गुगल फॉर्म भरावा लागणार आहे. संबंधित महाविद्यालये हा गुगल फॉर्म भरुन घेण्याची सोय विद्यार्थ्यांना लवकरच उपलब्ध करून देणार आहेत.
५ ते २९ ऑक्टोबर २०२० या कालावधीत अंतिम वषार्तील सर्व विद्यार्थ्यांच्या परीक्षा होतील, असे नियोजन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून करण्यात आले आहे. त्यामुळे, इतरही विद्यापीठांकडून याच कालावधीत परीक्षांचे नियोजन करण्यात येईल, असे दिसून येते. युवा सेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनी अंतिम वर्षाच्या परीक्षेला मोठा विरोध केला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ही परीक्षा बंधनकारक झाली आहे. आता, ही परीक्षा MCQ पद्धतीने घेतली जाणार असल्याचे समजते. मात्र, विद्यार्थ्यांनी अशी परीक्षा घेण्यावर नाराजी दर्शवली असून इतर राज्यांप्रमाणेच असाईनमेंट बेस्ड परीक्षा घेण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे.
अंतिम वर्षाची परीक्षा MCQ पद्धतीने घ्यायचे ठरल्याचे समजते. त्यामुळे विद्यार्थ्यांना घराबाहेर जावे लागणार नाही.
— Varun Sardesai (@SardesaiVarun) September 7, 2020
पर्याय चांगला असला तरी विद्यार्थ्यांना MCQचा अनुभव नाही व गेले ६ महिने अभ्यास देखील विस्कळीत झाला आहे.
हे लक्षात घेता युवासेना Question Bank पुरवण्याची मागणी करणार आहे.
आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्याही परीक्षा
आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या ८ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या अंतिम वर्षाच्या वैद्यकीय पदवी परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष बसावे लागणार आहे. प्रत्यक्षात परीक्षा घेण्याच्या निर्णयावर स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने शनिवारी नकार दिला. आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वेगवेगळ्या शाखेतील पदवी अभ्यासक्रमाच्या नऊ विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले. या याचिकेवरील सुनावणी न्या. ए.ए. सय्यद व न्या. एस. पी. तावडे यांच्या खंडपीठापुढे शनिवारी होती. २१ ऑगस्ट रोजी विद्यापीठाने परिपत्रक काढून अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात परीक्षेला बसणे बंधनकारक केले. या परिपत्रकाला विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. ‘आमच्या मते, विद्यार्थी ऐनवेळी उच्च न्यायालयात आले. त्यामुळे आम्ही परीक्षांना स्थगिती देण्याचा अंतरिम दिलासा देऊ शकत नाही,’ असे उच्च न्यायालयाने निकालात म्हटले आहे.