मुंबई : मुंबई विद्यापीठातील परीक्षा विभागातील भोंगळ कारभार अखेर सुरळीत होण्याची शक्यता आहे. कारण विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या नियंत्रक पदासाठी बुधवारी १० उमेदवारांची मुलाखत घेण्यात येणार आहे. त्यामुळे यामधील एका उमेदवारांची निवड नियंत्रक पदावर होण्याची शक्यता आहे.विशेष म्हणजे या दहा उमेदवारांमध्ये वादग्रस्त ठरलेल्या विलास शिंदे यांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मात्र शिंदे यांच्या नावाला विद्यार्थी संघटनांनी आक्षेप नोंदवला असून राज्य सरकारकडे त्याविरोधात दाद मागणार असल्याचेही सांगितले. तूर्तास तरी विद्यापीठ प्रशासनाकडे निवेदन देत विद्यार्थी संघटनांनी आपला रोष व्यक्त केला आहे. याआधी दिनेश भोंडे यांनी विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रक पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर सुमारे दीड वर्षांपासून नियंत्रक पद रिक्त आहे.सध्या या पदाचा प्रभारी भार दीपक वसावे यांकडे आहे. परीक्षा नियंत्रकाचे रिक्त पद भरण्यासाठी दोन वेळा जाहिरात देऊन मुलाखती घेण्यात आल्या. मात्र, नवीन विद्यापीठ कायदा येऊ घातल्यामुळे अखेरच्या वेळीस पार पडलेली संपूर्ण प्रक्रिया रद्द झाली होती. त्यानंतर पुन्हा नव्याने प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यावेळी छाननी समितीने १० मान्यवरांची निवड अंतिम फेरीसाठी केली आहे. या दहा उमेदवारांची मुलाखत मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट कॅम्पस येथे होणार आहे. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.संजय देशमुख, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. एम.ए.खान अशी एकूण सात जणांची समिती या मुलाखती घेणार आहेत. (प्रतिनिधी)
अखेर परीक्षा नियंत्रक मिळणार?
By admin | Published: October 05, 2016 3:28 AM