एमपीएससी उमदेवारांच्या भविष्याशी खेळ अजूनही सुरूच राहणार का ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:09 AM2021-07-14T04:09:08+5:302021-07-14T04:09:08+5:30
मुंबई : सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाच्या अनुषंगाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षेसंदर्भात काय कार्यवाही करावी, याबाबत सरकारकडून ...
मुंबई : सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाच्या अनुषंगाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षेसंदर्भात काय कार्यवाही करावी, याबाबत सरकारकडून सुधारित अभिप्राय मागविण्यात आले होते. त्यावर सरकारने अखेर ५ जुलै रोजी शासन निर्णय जाहीर केला असून, त्यानुसार पुढील कार्यवाही प्राधान्यक्रमाने करण्यात येणार आहे, अशी माहिती आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केली आहे. मात्र, अद्यापही परीक्षांच्या तारखा जाहीर न झाल्याने शासन फक्त उमेदवारांना आश्वासन देऊन त्यांच्या भविष्याशी खेळणार का, असा प्रश्न उमेदवार उपस्थित करत आहेत.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण होऊनही नोकरी मिळत नसल्याचा तणावामुळे पुण्यात स्वप्निल लोणकर या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्यानंतर लोकसेवा आयोगासह राज्य सरकारच्या कामकाजावर परीक्षार्थी विद्यार्थ्यांसह विविध क्षेत्रांतून ताशेरे ओढले गेले. त्यानंतर सरकारने जागे होत लवकरात लवकर निर्णय घेण्यात येईल, असे जाहीर केले. सरकारने ५ जुलै रोजी शासन निर्णय दिला असून, त्यानुसार कार्यवाही करणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. मात्र, अद्यापही संयुक्त पूर्व परीक्षा गट - ब या पदाची परीक्षा कधी होणार त्याची अजून तारीख घोषित नाही, त्याबाबतीत काहीच निर्णय घेण्यात आला नाही. २०२१ च्या वेळापत्रकाबाबत देखील सामान्य प्रशासन विभागाने अद्याप आयोगास मागणी पत्रक पाठविले नाही, अशी माहिती एमपीएससी स्टुडंट राइट्स या संघटनेकडून देण्यात आली आहे. शिवाय मागील अडीच वर्षांपासून रखडलेली सरळसेवा सोळा हजारांहून अधिक पदांची भरती प्रकिया कधी सुरू होणार, असे अनेक प्रश्नही त्यांनी उपस्थित केले आहेत.
स्वप्निलच्या आत्महत्येच्या आठवड्यानंतर आयोगाला त्याबद्दल बोलावेसे वाटत असेल तर इतर लाखो विद्यार्थ्यांबद्दल आयोग कधी बोलणार, असा सवाल उमेदवार विचारत आहेत. सरकारने मागील आठवड्यात स्पर्धा परीक्षांमधील समस्या सोडविण्यासाठी समिती स्थापन करण्याची घोषणा केली. ६ दिवस होऊन गेले मात्र त्याबद्दल काहीच माहिती देण्यात आली नसल्याची संतप्त प्रतिक्रिया उमेदवार व्यक्त करीत आहेत.
परीक्षेच्या सुधारित निकालाचे कामकाज सुरू
- सहायक वन संरक्षक, गट-अ, वनक्षेत्रपाल गट-ब पदासाठी १५ सप्टेंबर २०१९ रोजी ‘महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा-२०१९’ची लेखी परीक्षा झाली. तिचा निकाल ३० जानेवारी २०२० रोजी जाहीर झाला; परंतु भरती प्रक्रियेसंदर्भात ५ जुलै २०२१ रोजी सरकारकडून आलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार सुधारित निकाल जाहीर करण्याचे कामकाज सुरू आहे.
- सहायक अभियंता, विद्युत, गट-ब, श्रेणी-२ संवर्गातील १६ पदांसाठी २४ नोव्हेंबर २०१९ रोजी ‘महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-२०१९’ घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल २३ जून २०२० रोजी जाहीर झाला.