राज ठाकरे : लिलाव गुजरातमध्येच का ? मुंबई : मोदींच्या एवढ्याशा कोटाने गंगेची स्वच्छता होणार आहे का, केवळ टीका झाली यामुळेच त्या कोटाच्या लिलावाचा घाट घालण्यात आल्याची टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केली. गोरेगाव येथे मनसेच्या उपशाखाध्यक्ष आणि गटाध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात राज बोलत होते. या वेळी बोलताना राज यांनी नरेंद्र मोदी, टोल आदी विषयांवर फटकेबाजी केली. पंतप्रधान हे सारे देशाचे असतात. त्यांच्यासाठी देशातील सर्व राज्ये सारखीच असायला हवीत. पण, कोटाचा लिलाव झाला तोही गुजरातमध्ये. महाराष्ट्र अथवा बाकी राज्यात का केला नाही, अशी टीकाही राज यांनी केली. पक्षाच्या निवडणुकीतील कामगिरीबाबत बोलताना राज यांनी कार्यकर्त्यांना पराभव विसरून कामाला लागण्याचे आवाहन केले. मनसेचा जन्म निवडणुकांसाठी नव्हे, तर महाराष्ट्राच्या हितासाठी झाला आहे. भरतीनंतर ओहोटी आणि ओहोटीनंतर पुन्हा भरती असतेच. त्यामुळे पराभव मागे टाकून जुन्या शिवसैनिकांप्रमाणे काम करा, मनसे वगळता कोणताही पक्ष टोलच्या मुद्द्यावर बोलत नाही. टोलमुक्तीचं आश्वासन देत सत्तेवर आलेले आता टोलवर बोलायला तयार नाहीत, अशी टीका त्यांनी केली.